कराड : पश्चिम घटासह कोयना धरणक्षेत्रात गेल्या परवा शुक्रवारी रात्रीपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने कोयना धरणाचे टप्या- टप्याने तीन फुटांनी उघडण्यात आलेले सहा वक्री दरवाजे आता पाऊस बऱ्यापैकी ओसरु लागल्याने पुन्हा बंद करण्यात येत आहेत. कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांवरून दोन फुटांवर आणण्यात आले आहेत. पश्चिम घाटक्षेत्रात सुध्दा सर्वदूर जोरदार पाऊस ओसरत असल्याचे चित्र असल्याने नुकसान होत असलेल्या खरिपाच्या पिकांना पर्यायाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळत आहे.
कोयना पाणलोटातील जोरदार पावसाने कोयना धरणातील २,१०० क्युसेकवरून पाण्याची आवक २१,६९५ क्युसेक अशी दहापटीहून अधिक झेपावल्याने काठोकाठ भरलेल्या कोयनेचे सहा वक्री दरवाजे हे या ज्यादाच्या पाण्याच्या विसर्गासाठी तीन फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रात २७,९०० क्युसेक तसेच धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक असा ३० हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, कोयना पाणलोटातील जोरदार पाऊस कमी झाल्याने धरणाचे तीन फुटांनी उघडे सहाही दरवाजे दोन फुटांवर आणण्यात आले आणि कोयना जलाशयातील एकूण ३० हजार क्युसेकचा जलविसर्ग २०,३६६ क्युसेक असा कमी करण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटात केवळ ९.३३ मिमी. पाऊस झाला असून, त्यात कोयनानगरला ३ एकूण ४,६७० मिमी., नवजाला ८ एकूण ५,८९६ मिमी. तर, महाबळेश्वरला १७ एकूण ५,६०७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम घाटक्षेत्रातीलही जोरदार पर्जन्यवृष्टी निवळली असून, कुठेही जोरदार पाऊस नसून, अनेक ठिकाणी पावसाची नोंदच दिसत नाही.
परतीचा धुमाकूळ घालणारा पाऊस अगदीच ओसरल्याने नवरात्रोत्सवातील पावसाचे विघ्न नाहीसे होत असल्याचे सुखद चित्र आहे. त्यामुळे पावसाने निराश दुर्गाभक्तांमध्ये समाधानाची लहर दिसत आहे. नवरात्रोत्सवातील दांडीया, गरबा पुन्हा सुरु होण्यासह महाप्रसादाच्या पंगती उठवण्याची सार्वजनिक मंडळांची तयारीही गती घेत असल्याचे दिसत आहे.
खरिपाच्या उभ्या पिकांना जोरदार फटका देणारा पाऊस निवळल्याने खरीप हंगामातील उभ्या पिकांतून पाण्याचा निचरा कसा होतो, त्यातून शेतकऱ्याचा किती फायदा, किती तोटा होतो हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पिके कुजणे, दर्जा खालावणे, उत्पादनही घटणार असल्याने हवालदिल असलेल्या शेतकरीवर्गास काहीसा दिलासा मिळाला आहे.