मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सोळावा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते २९ ऑगस्टपासून आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे तीन प्रयत्न सरकारने केले, मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलेलं नाही. मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाची बैठक घेतली आणि सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भेटीला आले तरच मी उपोषण मागे घेण्याचा विचार करेन असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच सरकारसमोर त्यांनी पाच अटीही ठेवल्या आहेत. यातली एक अट लेखी आश्वासनाचीही आहे. त्याबाबत विचारलं असता जरांगे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटील?

“सरकारकडून लेखी आश्वासनाची जबाबदारी त्यांच्या एका मंत्रीमहोदयांनी घेतली आहे. ते येताना लेखी आणतीलच. राज्याचे प्रमुख येत आहेत. आम्ही मराठा समाज म्हणून त्यांचा योग्य सन्मान करणारच. आम्ही एक महिन्याचा वेळ त्यांना दिला आहे त्यामुळे महिनाभर आम्ही त्यांना काही बोलणार नाही. मी आंदोलन सुरु ठेवणार आहे. राज्याचे प्रमुख येत आहेत, त्यांनी तोंडी आश्वासन दिलं तरी खूप आहे. काही गरज नाही आमच्या समाजाला लेखी देण्याची. येऊन समाजाला संबोधन करा. लेखी तर ते आणतीलच” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी अर्जुन खोतकर आणि संदिपान भुमरे हे भेटले. त्यांनी सोमवारी बैठकीत काय काय घडलं त्याची माहिती मनोज जरांगेंना दिली. त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही त्यांची समजूत काढली. मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरू ठेवा. त्याप्रमाणेच आज मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेण्याची चिन्हं आहेत. ते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आपण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा चढणार नाही अशी प्रतिज्ञाही जरांगे पाटील यांनी मंगळवारीच केली आहे.

काय आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या?

१) अहवाल कसाही आला तरीही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार.

२) महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे गुन्हे मागे घेतले जावेत

३) जे अधिकारी दोषी आहेत त्यांचं निलंबन करा.

४) उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ तसंच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे सगळे तुमच्याबरोबर आले पाहिजेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजेच सरकार हे सगळं आम्हाला लेखी हवं आहे वेळेची मर्यादा घालून दिली आहे हे त्यात नमूद करावं.