मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या काळात समृद्धी महामार्ग बनून वाहतुकीसाठी खुलाही झाला, परंतु, मुंबई-गोवा महामार्गाचं काम अर्धेही झालेले नाही. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मार्गाच्या पुर्णत्वासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसंच, चंद्रयानावरून त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली आहे. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

“आज मी मोठं भाषण करायला आलो नाही. आज मी फक्त या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे. मला अजून कळलं नाही चांद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता”, असा मिश्किल टोमणा राज ठाकरेंनी लगावला आहे.

“हा महाराष्ट्रातील कोकणाचा भाग नाहीय, मुंबई नाशिकचीही तीच अवस्था आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांची तीच अवस्था आहे. मला राज्यातील लोकांचे कौतुक वाटतं. हे खड्डे आज नाही पडले, २००७ – ०८ साली या रस्त्याचं काम सुरू झालं. काँग्रेसचं सरकार, शिवेसना भाजपा सरकार आलं, मग कोणकोणाचं सरकार आलं. त्याला ना आकार ना उकार. पण एवढी सर्व सरकारं आल्यानंतरही त्याच खड्ड्यातून जात असताना त्याच त्याच लोकांना मतदान कसे करता याचंचं आश्चर्य वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खड्ड्यातून गेलो काय आणि खड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा घरी बसवावं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप आश्वासन देतात, गोष्टी सांगतात, हातात सत्ता येते, पुढे बघू करू म्हणतात”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“मला अजून नाही कळलं, आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत. मुंबई नाशिकहून येताना ८-८ तास लागतात. स्त्रीयांचे तर सर्वांत मोठे हाल होतात. पण काही नाही, चिंता नाही. हाल झाले तर झाले पण आम्ही तुम्हालाच मतदान करू”, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.