विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी वर्षा निवासस्थानी भेट झाली. १० जानेवारी रोजी १६ आमदारांच्या अपात्र प्रकरणी निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीवरून विरोधकांनी टीका केली आहे. तसंच, ठाकरे गटाने या भेटीवरून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. त्यामुळे ही भेट नेमकी का झाली, याबाबत राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

राहुल नार्वेकर म्हणाले, अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांना कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, काय-काय कारणं असू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी. तरीही ते असे आरोप करत असतील तर त्यामागचा हेतु काय हे स्पष्ट होतंय.

…तर मला परवानगीची आवश्यकता नाही

“विधानसभा अध्यक्ष जेव्हा अपात्रतेची याचिका निकाली काढत असतात त्यावेळेला त्यांनी इतर कामं करू नयेत असा कोणताही आदेश नाही. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामे असतात. त्यात मुख्यमंत्रीही सदस्य असतात. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझं कर्तव्य आहे. राज्याशी निगडीत इतर प्रश्नासंदर्भातील राज्यातील कार्यकारी मंडळातील मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्याची मला गरज असेल मला कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

हेही वाचा >> “काही घटना घडतात तेव्हा…” राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्र्यांचे बिनबुडाचे आरोप

माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ३ जानेवारी रोजी ठरली होती. परंतु, मी तेव्हा आजारी होतो. तीन-चार दिवस मला घरातून बाहेर पडता आलं नाही. प्रकृती सावरल्यानंतर रविवारी मतदारसंघातील काही महत्त्वाचे प्रश्न, विधिमंडळातील काही प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने मी त्यांची भेट घेतली. आणि त्या भेटीत कुलाबा-नरिमन पॉईंटचा विषय आहे. त्यात एमएमआरडीएकडून होणारी दिरंगाई, या प्रकल्पासाठी स्थानिकांचा विरोध असल्याने ओव्हरहेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनलिंग करण्याचा प्रस्ताव मी त्यांच्याकडे मांडला. दक्षिण मुंबईतील आठ मोठ्या रस्त्यांचं त्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे, दक्षिण मुंबईतील सहा ठिकाणंचं सौंदर्यीकरणाचा विषय होता. विधिमंडळातील कंत्राट कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करणं, १३२ पदे रिक्त आहेत त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चर्चा प्रलंबित होती, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु, जे स्वतः माजी मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर असे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचा मूळ हेतू स्पष्ट होतो, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज जयंत पाटील आणि अनिल देसाईंचीही घेतली भेट

“मी आज सकाळी मुंबई विमानतळाच्या व्हीआयपी लाँजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो. मग ती भेटही हेतुपुरस्सर होती का? शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची याचिका आहे ते मला वर्षभर भेटले नसतील का? मला अनेकजण येऊन भेटले आहेत. मी कोणालाच भेटायचं नाही का?” असा प्रश्नही राहुल नार्वेकरांनी विचारला.

निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न

“हे आरोप बिनबुडाचे आहेत. निर्णय घेण्याऱ्या व्यक्तीवर दबाव आणि प्रभाव टाकण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावर, १९८६ च्या नियमांच्या आधारावर, विधिमंडळाचे पायंडे, प्रथा परंपरांचा विचार करून अत्यंत कायदेशीर निर्णय घेऊन जतनेला न्याय देणार आहे”, असंही आश्वासन राहुल नार्वेकरांनी दिलं.