Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या मुद्यांवरून चांगलेच चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत. मात्र, तरीही त्यांनी मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान अद्याप सोडलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यामुळे सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडलं नसल्याचं स्पष्टीकरण याआधी दिलं होतं. मात्र, धनंजय मुंडे यांनी स्वत:च विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या एका सदनिकेचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मुंबईत घर असूनही धनंजय मुंडे यांनी अद्याप शासकीय निवासस्थान का सोडलं नाही? यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत.
तसेच या संदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या. दरम्यान, त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत आपण आतापर्यंत सातपुडा हे शासकीय निवासस्थान का रिक्त केलं नाही? तसेच आपण सातपुडा शासकीय निवासस्थान कधी सोडणार? याबाबत आता स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
“मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यासाठी योग्य नसून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे, माझा शोधही सुरु आहे. माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केली आहे”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.