ठाणे जिल्ह्यातील १०० जणांना सरकारी खर्चातून संरक्षण दिले असल्याचा मोठा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. तसंच, याबाबत अधिक माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत असून त्यांना माहिती दिली जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले की, “मी माहिती अधिकारातून माहिती घेऊ शकतो. विरोधी पक्ष नेता म्हणूनही माहिती मागण्याचा अधिकार मला आहे. परंतु, माहिती गुप्त राहते असा काही भाग नाही. गेले वर्षभर मी ठाणे जिल्ह्यात संरक्षण घेणारे कोण कोण याची माहिती मागतोय, पण याची माहिती दिली जात नाहीय. ठाणे जिल्ह्यात १०० जणांना संरक्षण दिलं जातंय. अशी काय ठाणे जिल्ह्यात घडलंय की त्यांना संरक्षण दिलं जातंय?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

हेही वाचा>> “वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून…”, शिंदे गटाच्या नव्या जाहिरातीवरून अजित पवारांचा संताप, म्हणाले, “नऊ जणांची माळ…”

“आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या जीवाला भिती असेल तर त्यांना संरक्षण देण्याचं काम आहे. परंतु, तुम्ही १०० लोकांना संरक्षण देताय तर त्याचा खर्च शासनावर पडतो. माझ्याकडे असलेल्या १०० जणांच्या यादीमध्ये काही व्यावसायिक आहेत. या व्यवसायधारकांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. तुम्ही व्यवसाय बदला, मग संरक्षणाची गरज काय? १०० लोकांची यादी आहे. त्यात लोकप्रतिनिधी आहेत. सर्वसामान्य माणसांचा जीव धोक्यात आला तर त्याला संरक्षण देणं याला मला आक्षेप नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

कोणत्याही सरकारला शोभा देत नाही

“संरक्षण देणं चुकीचं नाही. परंतु, आपण आता राज्यकर्ते झाले आहोत, त्यामुळे आपण आपल्या बगलबादशाहांना, सहकाऱ्यांना सरकारी पैशांनी संरक्षण दिलं हे अजिबात योग्य नाही. सरकारी खर्चाने संरक्षण दिलं असेल तर त्याची माहिती घ्या. कारण जनतेच्या पैशांचा खर्च करणे हे कोणत्याही सरकारला शोभा देत नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

पोलीस वरिष्ठ निरिक्षकाकडे एवढी संपत्ती कशी?

“शेखर बागडे ठाणे जिल्ह्यात काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे”, असा आरोपही अजित पवारांनी केला. यावेळी शेखर बडगे यांच्या मालमत्तांची नावेच त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितली. यामध्ये फ्लॅट, शेतजमिनींचा समावेश आहे. “एक पोलीस एवढी बेहिशोबी मालमत्ता कशी काय गोळा करू शकतो? सरकारने यासंदर्भात चौकशी करावी”, असं अजित पवार म्हणाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जमा केली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अतिरिक्त आयुक्तांकडे धाड टाकल्यावर त्यांच्याकडे सहा कोटींची रोख-रक्कम सापडली. अनेक प्रकारची माहिती, कागदपत्रे मिळाली. सरकारचा वकुब असायला पाहिजे, सरकारचा दरारा असला पाहिजे, तोच राहिलेला नाही. कारण सगळेच आओ-जाओ घर तुम्हाला अशा पद्धतीने भ्रष्टाचार करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्हीही या घटना समोर आणतोय”, असंही अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादीत कोणा कोणाचं नाव?

आमदार, खासदार, माजी नगरसेवक, वकिल, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, कोणाच्या कार्यकर्त्यांची पत्नी, नेत्यांची पत्नी, बांधकाम व्यवसायिक, मनसुख हिरेन यांची पत्नी आणि त्यांचे सदस्य, ३०२ चा साक्षीदार, आरटीआयचा कार्यकर्ता, कुठल्या पक्षाचे प्रवक्ते, अमक्या अमक्या शेठचा मुलगा, ऑक्सिगॅस कंपनी, एमएमआरडीएमध्ये आयएएस ऑफिसर आदी व्यावसायिकांची या यादीत नावे आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.