महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून, भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले म्हणाले की, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हटलं. तर, गडकरी नवे आदर्श आहेत, असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली, असे निर्लज्ज वक्तव्य केलं. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली. तर, आमदार प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा जावई शोध लावला.”

हेही वाचा : “मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही, परंतु…”; फडणवीसांच विधान!

“आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. याआधी छिंदम नावाच्या भाजपाच्या नेत्यांनेही असेच दिवे लावले होते. यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्वजण भाजपाचेच आहेत,” अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा : “शिंदे गट आणि भाजपानं शेपटी…”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

“महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भाजपाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्ये होत असताना या विधानांचा तीव्र शब्दांत निषेध करून कारवाई करणे अपेक्षित होते. पण भाजपाने तसे काहीही केले नाही. उलट सारवासारव करण्यात आली. भाजपा नितिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवतांचा अपमान कदापी सहन करणार नाही. भाजपाच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bjp not action against koshyari lad lodha over chhatrapati shivaji maharaj statement say nana patole ssa
First published on: 05-12-2022 at 15:30 IST