नांदेड : दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर मराठवाड्याचेच. १९८५-८६ दरम्यान जेमतेम १० महिन्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी त्यांना मंत्रीपद मिळाले; पण या कालावधीत या शांत-सुस्वभावी नेत्याने राजकीय उपेक्षेबाबत कधी कुरकूर केली नाही किंवा आपल्या राजकीय उपेक्षेला ‘वनवास’ म्हटले नाही. शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहिले.

वयाची नव्वदी पार केलेले नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, पैठणचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल आणि अशी कितीतरी नावे मराठवाड्यातली, जे मिळाले त्यात समाधान मानणारे. अलीकडच्या काळात काँग्रेस व अन्य पक्षांतून भाजपात जाणारा लोंढा वाढला, तरी भोसीकर, पटेल ही मंडळी आजही काँग्रेस पक्षासाठी कार्यरत आहे. निलंगेकर-भोसीकर यांच्यानंतर पक्षाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या अशोक चव्हाण यांना दीर्घकाळ पक्षाकडून मानाची पदे मिळाली, तरी त्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल खंत व्यक्त केल्यानंतर काँग्रेसजनांनीच नव्हे, तर अनेक परिचित-अपरिचितांनी समाजमाध्यमांवरून आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या रविवारी खा.अशोक चव्हाण हे लातूर येथे भाजपाच्या कार्यक्रमात बोलताना २०१० साली मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये आपल्याला वनवास भोगावा लागला, अशा आशयाचे वक्तव्य केले. नांदेडमधील स्थानिक माध्यमांनी त्याकडे आणि वस्तुस्थितीकडे काणाडोळा केला, तरी पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका भूमिकन्येने आपल्या यू-ट्यूब वाहिनीवरून चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, ते आज ज्या भाजपामध्ये आहेत, त्या पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी नांदेडमध्येच चव्हाण यांच्याविरुद्ध काय विधाने केली होती, याचा दाखलाही दिला.

काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना योग्यता-पात्रता असतानाही प्रस्थापितांमुळे सत्तेमध्ये संधी मिळाली नाही. नांदेड जिल्ह्याचे उदाहरण द्यायचे झाले, तर १९९३ ते २०२२ या सुमारे ३० वर्षांत राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तेव्हा चव्हाणांनीच बहुसंख्य काळ मंत्रिपदाचा दिवा मिरविला. २०१० साली त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर अनुभवी वसंतराव चव्हाण यांना राज्यमंत्री करण्याऐवजी त्यांनी राजकारणात नवखे असलेले आपले मित्र डी.पी.सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली होती. अशोक चव्हाणांबद्दल व्यक्त होणार्‍या प्रतिक्रियांमध्ये वरील बाबीची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात शिवाजीराव निलंगेकरांचे उदाहरण तर महत्त्वाचेच. विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविणार्‍या या नेत्यास १९८५ साली वसंतदादा पाटील यांच्या शिफारशीवरून राज्याचे सर्वोच्च पद मिळाले होते. जून १९८५ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. पण एका प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे ठरले. नंतरच्या काळात राज्यामध्ये व्ही.पी.सिंग यांची लाट आली, भाजपाचा रथ धावायला लागला होता. पण निलंगेकरांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही. उलट अवघड काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. १९९५ साली या ज्येष्ठास एका कामगार नेत्याने पराभूत केले, तरी ते खचले नाहीत. पुढच्या निवडणुकीत निलंग्याच्या आपल्या पारंपरिक जागेवर विजय संपादन करून ते पुन्हा आमदार झाले. याच कार्यकाळात सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूलमंत्रीपद देऊन तब्बल १८ वर्षांनंतर त्यांचे पुनर्वसन केले गेले. या काळात आणि नंतरही शिवाजीरावांनी ‘वनवास’ हा शब्द कधी उच्चारला नाही.

या पार्श्वभूमीवर नांदेडचे विद्यमान खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांना तिरकसपणे उत्तर दिले. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने तुम्हाला खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री केले, याला वनवास म्हणायचे काय, असा सवाल करून रवींद्र चव्हाण यांनी शिवाजीराव निलंगेकर, ईश्वरराव भोसीकर आदी काँग्रेसनिष्ठ नेत्यांचा संदर्भ माजी मुख्यमंत्र्यांना दिला.