अकोले : युद्धबंदीनंतरही सीमेवर भारतीय सैनिक शहीद का होत आहेत? असा सवाल करीत विजयी मिरवणुका काढणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केली आहे. व्यापारबंदीची धमकी दिल्यानंतर भारत व पाकिस्तान यांनी युद्धबंदी जाहीर केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते.
ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे खरोखरच युद्धबंदी झाली असेल तर मग सीमेपलीकडून होणारा गोळीबार तसेच सीमेच्या आतमध्येही सुरू असणारा गोळीबार थांबला पाहिजे होता. मात्र तसे झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सुपुत्र शहीद संदीप गायकर यास चकमकीमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. युद्धबंदी असतानाही या आमच्या लेकराला प्राण का गमवावे लागले? विजयी मिरवणुका काढणारे हा प्रश्न ट्रम्प आणि पाकिस्तानला विचारणार आहेत का? देशवासीयांपासून काही लपविले जाते आहे का? असा ठोस प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यकर्त्यांना व भारतीय जनता पक्षाला विचारत असल्याचे ते म्हणाले.
शहीद संदीप गायकर यांच्या शहीद होण्याची बातमी त्यांच्या ब्राह्मणवाडा गावात व अकोले तालुक्यात येऊन धडकली असताना सुद्धा तेथील भाजप व संबंधित नेत्यांनी मोदींना विजयाचे श्रेय देणारी यात्रा काढली. राज्यभर व देशभर अशा विजयी यात्रा काढल्या जात आहेत. एकीकडे विजय यात्रा काढायच्या, युद्धबंदीचे सुद्धा राजकारण करायचे, श्रेय घ्यायचे व दुसऱ्या बाजूला शेतकरी, कष्टकरी, श्रमिक जनतेची लेकरे सीमेवर शहीद होत असताना युद्धबंदी असल्याचे सांगायचे ही अनेक प्रश्नांना जन्म देणारी बाब आहे. भारतीयांपासून काही लपविले जात आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे.
युद्धबंदीबाबत व ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत सविस्तर चर्चा करावी व त्यासाठी स्वतंत्र सत्र घ्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. मात्र याबाबत चर्चा टाळली जात आहे. केंद्रातील भाजप सरकारने याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता आहे. युद्धबंदी असतानाही गोळीबारात भारतीय सैनिकांचे प्राण का जात आहेत, याचे उत्तर त्यांनी देशाला दिलेच पाहिजे असे ते म्हणाले.