मराठी भाषा दिनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची एकाचवेळी २१ पुस्तके “‘मराठी विकिस्रोत”‘ या मुक्त ग्रंथालयात दाखल झाली. यामुळे विकिमीडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्रोताने मराठी पुस्तकांची शंभरी ओलांडली आहे. या प्रकल्पात एकूण ११२ पुस्तके उपलब्ध झाली असून आता जगभरातील वाचक ही पुस्तके कधीही कोणत्याही साधनाचा वापर करून वाचू शकतील.

“‘मराठी विकिस्रोत”‘ म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या मराठी “स्रोत” दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून ‘विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.

या प्रकल्पांत अधिकाधिक पुस्तके दाखल व्हावीत असा प्रयत्न सुरु होता. त्याला प्रतिसाद मिळाल्याने आतापर्यंत नामवंत लेखकांची ९० पुस्तके उपलब्ध होती. त्यामध्ये विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ, व्यवस्थापन गुरु शरू रांगणेकर आदींचा समावेश आहे.

बुधवारी कोल्हापुरातील डॉ. सुनीलकुमार लवटे यांची एकाचवेळी २१ पुस्तके दाखल झाली. यामुळे विकिमीडिया कॉमन्सवरील मराठी पुस्तकांच्या संख्येचे शतक ओलांडण्याचा विक्रमही झाला आहे. पुढच्या टप्प्यात ही पुस्तके विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयात युनिकोड रुपासह समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे ही सर्व पुस्तके इंटरनेटवर शोधता येणे शक्य होणार आहेत. या दानामुळे विशेषत: या उपक्रमात इंटरनेटवर मराठीतून ज्ञान वाढण्यासाठी प्रयत्न करणारे ‘सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यासाठी मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. याला भरभरून प्रतिसाद दिला तो जाई निमकर यांनी. प्रख्यात लेखिका इरावती कर्वे यांची ‘युगांतर ‘सह सहा पुस्तके त्यांच्या कन्या जाई निमकर यांनी या प्रकल्पाकडे सोपवली आहेत. या संदर्भ देऊन सुबोध कुलकर्णी यांनी अधीकाधिक साहित्यिकांच्या वारसांनी त्यांच्याकडील पुस्तके या उपक्रमाकडे पाठवावीत असे आवाहन बुधवारी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केले.