सावंतवाडी: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोवा राज्यात दाखल झाला आहे. शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरातून प्रवास करत त्याने कडशी नदी पार केली आणि गोव्यातील मोपा गावात प्रवेश केला. तो थेट मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जंगलात पोहोचला.
वनविभागाच्या म्हणण्यानुसार, विमानतळावरील विद्युत रोषणाई आणि गर्दी पाहून तो पुन्हा मोपा गावाच्या दिशेने परतला आहे. सध्या तो मोपा, कडशी आणि चांदेल या भागांत फिरत असून, काही शेतकऱ्यांच्या काजूबागेत त्याने आसरा घेतला आहे. गोवा वनविभागाचे पथक त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
याआधी शनिवारी दिवसभर हा हत्ती नेतर्डे गावाजवळच्या धनगरवाडी आणि खोलबागवाडीत होता. दुपारी एका पाणवठ्याजवळ थांबून तो पुढे निघाला. रात्री उशिरा तो महाराष्ट्राच्या सीमेवरून गोव्यामध्ये गेला. हा हत्ती तरुण आणि आक्रमक असल्यामुळे वनविभागाने स्थानिक गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्लाही वनविभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग वनविभागही यावर लक्ष ठेवून असून, उपवनसंरक्षक मिनिष शर्मा, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, प्रमोद राणे आणि बबन रेडकर यांचे पथक सीमेवर गस्त घालत आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मते, ‘ओंकार’ हत्ती महाराष्ट्र-गोवा सीमेवरच फिरत असल्यामुळे तो कधीही पुन्हा महाराष्ट्रात परत येऊ शकतो.