सावंतवाडी : गोवा राज्यातून फिरून आलेला ‘ओंकार’ नावाचा जंगली हत्ती शनिवारी दुपारी सावंतवाडी तालुक्यातील सातोसे–मडूरा (सिंधुदुर्ग जिल्हा) परिसरात दाखल झाला आहे. हत्ती गावात आल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो-व्हिडिओ घेण्यासाठी मोठी गर्दी केली. गेल्या काही महिन्यांपासून हा हत्ती सातत्याने दोडामार्ग, बांदा, तिलारी, गोवा राज्यातील मोपा, आणि तोरसे या भागात वावरत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ओंकार हत्तीच्या या वाढत्या वावरामुळे शेती, बागायती आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याच्या वारंवार तक्रारी मिळत आहेत. सध्या सिंधुदुर्गात भातकापणीची वेळ जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.स्थानिक लोकांना या हत्तीला “ओंकार” या नावाने हाक मारल्यास तो जवळ येतो, याची माहिती आहे. यामुळे लोकांमध्ये या हत्तीबद्दल एक प्रकारची उत्सुकता आणि आपुलकी निर्माण झाली आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक जण त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, हत्ती सध्या सातोसे–मडूरा परिसरात दिवसाढवळ्याही शेतात शिरून भातशेती, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळपर्यंत हा हत्ती कास गावातून पुन्हा सातोसेच्या दिशेने मार्गस्थ झाला.
या उपद्रवी हत्तीला सुरक्षितरित्या पकडून त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. या हत्तीला जेरबंद करणे किंवा हुसकावून लावणे कठीण ठरत असल्याचे दिसत आहे.ग्रामस्थांनी ओंकार हत्तीला सुरक्षितरित्या पकडून दूरच्या जंगलात सोडावे, अशी मागणी केली आहे. यामुळे मानवी जीवितहानी टळेल आणि शेतीचे नुकसानही थांबेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
बांदा पोलिस व वनविभाग यांनी नागरिकांना हत्तीचे फोटो-व्हिडिओ काढताना त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि सुरक्षित अंतर राखावे, अशा सूचना केल्या आहेत.ओंकार हत्तीचा सातत्याने होणारा वावर आणि त्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान पाहता, वन विभागाने तातडीने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी देत आहेत.