मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील गेल्या १६ दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषण करत आहेत. सरकारने त्यांच्याकडे १ महिन्याचा अवधी मागितला होता. मनोज जरांगे पाटलांनी सरकारची ही मागणी पूर्ण केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातूनच उपोषण सोडणार असल्याचा निर्धार काल (१२ सप्टेंबर) केला होता. त्यानुसार, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपोषणस्थळी जाणार असल्याचे वृत्त होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. आज ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच.”
हेही वाचा >> मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जालन्याला येऊन भेट घेणार, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा सुरू आहे. आमचे मंत्री कालही तिकडे आणि आजही तिकडे जाणार आहेत. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय घेईन. मीही काल मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली आहे. यावेळी पाटलांनी आमच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. सरकारची भूमिका, तांत्रिक बाबी त्यांनी समजून घेतल्या आहेत. आज पुन्हा आमचे लोक त्यांच्याशी बोलतील आणि निर्णय घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
“ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही”
मराठा समाजाला ३० दिवसांत आरक्षण मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिलं तर तुम्ही ही जागा सोडणार का, उपोषण सोडणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “नाही, ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला.”