राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. संभाजीराजे यांना शिवसेना राज्यसभा देत असेल, तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज डोंबिवली येथील संदप गावात होते. गावातील खदाणीत बुडून मृत पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी ते याठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी गायकवाड कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर पत्रकारांनी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याबाबत विचारलं.

पत्रकाराच्या प्रश्नाला प्रतिसाद देताना आठवले म्हणाले की, ‘संभाजीराजेंनी शिवसेनेत जाऊ नये. त्यांना भाजपाने सहा वर्षांसाठी राज्यसभा दिली होती. त्यांनी भाजपामध्ये राहिलं पाहिजे. पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘त्यांना कोणत्या पक्षात जायचं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे. पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.