संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ आज, गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी साडेतीनच्या दरम्यान संगमनेरकडून पुण्याकडे जाणारी मोटार व समोरून येणारा आयशर टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातात मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याकडे जाणारी मोटार ( एमएच १२ एफ १४२१) चंदनापुरी शिवारात आली असता, संगमनेरच्या दिशेने येत असलेला टेम्पो ( एमएच १३ सीयू ९१५६) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसह मार्गावरील वाहनचालकही तेथे थांबल्याने गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात मोटारीतील ५५ वर्षीय सुभद्रा बाळू रुपनर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेले राजेंद्र बाळू रुपनर (वय ३८), संजय बाळू रुपनर (वय ३७) आणि मास्टर आरुष राजेंद्र रुपनर (वय ११) हे जखमी झाले. दुर्दैवाने याच अपघातात ४० वर्षीय लता काळे यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण बजरंगवाडी, कर्जत येथील रहिवासी आहेत.
या मार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका ते जावळे वस्ती या भागात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. एकेरी वाहतुकीमुळे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून विविध अपघातांत आजवर अनेक बळी गेले आहेत.