Woman Hit By Train Video: रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पुलाचा वापर करावा, असे रेल्वेकडून वारंवार सांगूनही अनेक लोक निष्काळजीपणे रूळावरून प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करत असतात. या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक जणांना अपंगत्वही आले आहे. मात्र तरीही ठिकठिकाणी या घटनांची पुनरावृत्ती होत राहते. नुकतेच जळगाव रेल्वे स्थानकातही असाच एक प्रकार घडला असून आरपीएफ जवानाने वेळीच चपळता दाखवत एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावरच्या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एक महिला सामानाची बॅग घेऊन रूळ ओलांडताना दिसत आहे. मात्र तिला प्लॅटफॉर्मवर चढताना अडचण येते. तेवढ्यात समोरून एक रेल्वे येताना दिसते. पुढे अनर्थ होण्याआधीच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान चांगो पाटील धावत येताना दिसतात. मात्र त्यांनी महिलेला पकडून बाहेर काढण्याआधीच रेल्वेची धडक बसते. रेल्वेबरोबर सदर महिला काही अंतर फरफटत जाताना दिसत आहे.

आता महिला रेल्वेखाली जाते की काय? अशी भीती वाटत असतानाच चांगो पाटील पुन्हा धावत जातात आणि रेल्वेबरोबर फरफटत जात असलेल्या महिलेला बाहेर काढतात. यानंतर इतर पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीही मदतीसाठी पुढे येतात. यानंतर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.