शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: राज्यात लसीकरण मोहीम सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी शहरांमध्ये अजूनही लसीकरणामध्ये महिला मागेच असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण सुमारे चार टक्क्यांनी कमी झाल्याचे कोविनची आकडेवारी आणि २०११ च्या जनगणनेनुसार आढळले आहे.

सुरुवातीला लसींची कमतरता, केंद्रावरील गर्दी आणि पुरुष कामासाठी बाहेर जात असल्याने त्यांना प्राधान्य अशी काही कारणे समोर आली होती. परंतु आता लसीकरणाला एक वर्षांहूनही अधिक काळ उलटला तरी या स्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी महिलांचा लसीकरणाचा टक्का आणखीनच घसरल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात महिला आणि पुरुषांचे प्रमाण अनुक्रमे ४९ टक्के आणि ५१ टक्के आहे. लसीकरणात मात्र महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे, तर पुरुषांनी मात्र आघाडी मारत लसीकरणात ५३ टक्के वाटा घेतला आहे.

राज्यभरात काही अपवादात्मक जिल्हे वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लसीकरणात महिला मागेच असल्याचे कोविनच्या आकडेवारीमध्ये आढळले आहे.

पुणे, मुंबईत टक्का घसरला

मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे चार टक्क्यांनी महिला लसीकरणामध्ये मागे आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत महिला आणि पुरुषांचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ४५ टक्के आणि ५५ टक्के आहे. परंतु लसीकरणामध्ये पुरुषांचा टक्का वाढून ५९ टक्के झाला आहे, तर महिलांचा टक्का ४१ पर्यत घसरला आहे. पुण्यातही हीच स्थिती आहे. पुण्यात महिलाचे प्रमाण सुमारे ४८ टक्के तर पुरुषांचे ५२ टक्के आहे. लसीकरणामध्ये मात्र पुरुषांचे प्रमाण ५६ टक्के तर महिलांचे ४४ टक्के झाले आहे. त्या खालोखाल ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, रत्नागिरी, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये महिलांचा लसीकरणाचा टक्का दोन टक्क्यांपेक्षाही अधिक घसरला आहे. तर पुरुषांचे प्रमाण मात्र वाढले आहे.

विदर्भात आघाडीवर..

राज्यभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरणाचे प्रमाण कमी असले तरी नागपूर, भंडारा आणि गोदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र लसीकरम्णात महिलांनी आघाडी केली आहे. नागपूरमध्ये महिलांचे प्रमाण ४६ टक्के आहे, तर लसीकरणाचे प्रमाण वाढून ४९ टक्के झाले आहे. भंडारा आणि गोंदियामध्येही एक ते दोन टक्क्यांनी वाढले आहे.

निरीक्षण काय?

पुरुष कामासाठी बाहेर जात असल्यामुळे लसीकरम्णाबाबत कुटुंबात अधिक प्राधान्य दिले जाते. कामासाठी जाणाऱ्या महिलांना इतर सोई सुविधांचा वापर करण्यासाठी लसीकरण सक्तीचे असल्यामुळे त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु घरातच असणाऱ्या गृहिणी मात्र अजूनही लसीकरणासाठी फारसा पुढाकार घेत नाहीत, असे मुंबईच्या वस्त्यांमध्ये लसीकरणसाठी कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. लसीकरण केंद्र विभागामध्ये असली तरी झोपडपट्टीमध्ये फारशी जागरूकता नसल्यामुळेही या महिला घराबाहेर पडून लसीकरणासाठी येत नसल्याचे निरीक्षण या कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.  

करोनाकाळात स्थलांतरित झालेला मजूरवर्ग जरी कामासाठी शहरात परतला असला तरी त्यांची कुटुंबे अजून गावीच आहेत. त्यामुळे शहरातील प्रसूती होणाऱ्या महिलांचे प्रमाणही कमी आहे. या महिला लसीकरणाच्या प्रक्रियेत न आल्यामुळे शहरातील महिलांचे लसीकरणाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका. 

मुंबईत पालिकेने महिलांचे लसीकरण वाढविण्यासाठी महिला विशेष लसीकरण शिबिरे घेतली आहेत. त्यामुळे महिलांना लसीकरणात सामावून घेण्यासाठी विभाग स्तरावरही प्रयत्न केले आहेत. 

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका