शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची मंगळवारी (५ जुलै) शिवसेना भवन येथे बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत साताऱ्याच्या एका महिला पदाधिकाऱ्याने बंडखोरी करणाऱ्या आमदारांना “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”, असा इशारा दिला. तसेच जे गेले ते कावळे आहेत आणि राहिले तेच खरे मावळे असल्याचा टोलाही लगावला. हे आक्रमक भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसैनिक महिला पदाधिकारी म्हणाल्या, “महाराष्ट्रात आपली ताकद उभी करायची असेल तर माझ्या भगिनी माझ्या भावाच्या पाठिशी उभ्या राहा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माझ्या महिला शिवसैनिकांच्या रक्तारक्तात आहेत. तुम्ही घाबरू नका या कावळ्यांच्या बापाला कुणी घाबरत नाही. माझ्या या सर्व रणरागिण्या कुणाचा कुणीही येऊ द्या, आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आधीही नव्हतो आणि आत्ताही नाही. ते गेले उडत. आम्हाला त्यांची गरज नाही. ते उडत गेले, तर आता आमच्या मतदारसंघात येऊ द्या, आम्हीही दांडे सोडून ठेवले आहेत.”

“प्रचाराला या नेत्यांच्या मागे पळताना आमच्या चपला तुटायच्या”

“हे सर्व माझ्या शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले. एवढा मोठा निधी घशात घातला. त्यांनी आम्हाला कधीही रस्त्याची कामं करून दिली नाही. माझ्या महिलांच्या पाठिवर कधी कौतुकाची थाप टाकली नाही. प्रचाराला या नेत्यांच्या मागे पळताना आमच्या चपला तुटायच्या तरीही आम्ही मागे पळायचो. ते आम्हाला मागे सरका म्हणत पुढे जायचे. ही आमची इज्जत होती. त्यांनी आम्हाला कधीही सन्मान दिला नाही. असं असलं तरी आमचं ध्येय फक्त धनुष्यबाण होतं,” असं या शिवसैनिकाने म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

“आम्हाला दगड उमेदवार द्या, आमच्यात त्याला निवडून आणायची ताकद”

या महिला पदाधिकारी पुढे म्हणाल्या, “माझ्या सातारा जिल्ह्यातील जे आमदार गेले आहेत त्यांनी काहीही काम केलं नव्हतं. त्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्यही केलं नाही. कधी कार्यक्रम घेतला तर आम्हाला बोलावलं देखील जात नव्हतं. कधी बॅनरवर आमचे फोटोही नव्हते. एखादं पत्र घेऊन गेले तर ते कुठं टाकून देत होते माहिती पडत नव्हतं. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला कोणताही दगड-माती द्या, त्यांना निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे.”

हेही वाचा : “सर्वांमागील कर्ताधर्ता हे”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर फडणवीस हात जोडून म्हणाले, “सगळं उघडं करू नका”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे कावळे भाजपाच्या मदतीने आपल्याला मानसिक त्रास देणार”

“उद्यापासून हे कावळे मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत. मी शिवसेनेच्या महिला आघाडीला विनंती करते की हे कावळे भाजपाच्या मदतीने आपल्याला मानसिक त्रास देणार आहेत. त्यांचा एकत्रितपणे सामना करू,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी माझ्याकडे १९९७ मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचं पत्र आहे, असंही सांगितलं.