जगातील १७५० कंपन्यांमधून ‘ग्रामहित’ची निवड

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यतील एका तरुण शेतकरी दाम्पत्याचे ‘सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सोल्विंग अवार्ड २०२१’साठी नामांकन झाले आहे. जगातील एक हजार ७५० कंपन्यांमधून नामांकन झालेल्या ४२ कंपनीत जिल्ह्यतील आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील ‘ग्रामहित’ कंपनीचा समावेश आहे.

युवा शेतकरी पंकज महल्ले व श्वेता ठाकरे (महल्ले) या दाम्पत्याने कार्पोरेट क्षेत्रातून बाहेर पडत यवतमाळचा आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक पुसण्यासाठी शेती कसण्याचा मार्ग पत्करला. त्यातून उभ्या राहिलेल्या ‘ग्रामहित’ कंपनीने अल्पावधीतच सातासमुद्रापार झेंडा रोवला. ‘सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सोल्विंग अवार्ड’साठी नामांकन झालेल्या जगभरातील ४२ कंपन्यांमध्ये भारतातील केवळ तीन कंपन्या असून त्यातील एक महाराष्ट्रातील ‘ग्रामहित’ ही कंपनी आहे.

शेतमाल विक्री व्यवस्थेत होणारे शेतकऱ्यांचे शोषण थांबावे, त्याच्या मालास अधिक दर मिळून आडत, हमाली, मापारी यात खर्च होणाऱ्या त्याच्या पैशांची बचत व्हावी तसेच योग्य भाव मिळेपर्यंत शेतमाल तारण ठेवून त्यावर माफक दरात कर्ज सुविधा उपलब्ध असावी, या दृष्टीने मोबाईलच्या माध्यमातून बाजार व्यवस्था सुलभ आणि विश्वसनीय करण्याचा प्रयत्न पंकज आणि श्वेता या दाम्पत्याने केला आहे. शेतमाल विपणन अव्यवस्थेवरील हे प्रभावी मॉडेल गेल्या वर्षभरापासून वरुड, सावळी सदोबा आणि कळंब येथे प्रत्यक्ष वापरले जात आहे. हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. मालाची गुणवत्ता निश्चित करण्याची सोपी व खात्रीशीर पद्धत आणि त्यानुसार दिला जाणारा बोनस तसेच तारण ठेवल्या तारखेला शेतमालाचे असलेले वजन विक्रीचे वेळी ग्रा धरला जाते. तारण ठेवलेला शेतमाल परस्पर घरूनच मोबाईलच्या एका क्लिकवर विकता येतो. १२ तासांच्या आत विक्रीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कुठलीही कपात न करता जमा होतात. ‘ग्रामहित’द्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतमाल विक्री व्यवस्थेच्या या वैशिष्टय़पूर्ण साखळीची दखल या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी घेतल्या गेली आहे. लोकपसंतीच्या बळावर आता ‘ग्रामहित’ची एक कोटी ८५ लाख रुपयांच्या बक्षिसाकडे वाटचाल सुरू आहे.

पंकज महल्ले यांनी येथील सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातून पदवी तर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा सीएसआर प्रकल्पांतर्गत जमशेदपूर येथे उच्च पदावर काम केले आहे. ती नोकरी सोडून दोन वर्षांपासून ते पत्नी श्वेतासह ‘ग्रामहित’मार्फत शेतकरी हिताचा प्रयोग राबवत आहेत. श्वेता या सुद्धा हैदराबाद येथे एका कार्पोरेट कंपनीत उच्च पदावर कार्यरत होत्या. या दाम्पत्याच्या कष्टामुळे आर्णी तालुक्यातील वरुड तुका गाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.