समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर झपाट्याने घटत चालला आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग तंत्रनिदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींना आईच्या गर्भातच मारून टाकण्याचे प्रकार उत्तरोत्तर वाढत आहे. त्यामुळे लग्नासाठी मुलींचे स्थळ मिळणे कठीण होत आहे. या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात लग्नाळू तरूणांनी नवरी मिळण्यासाठी नवरदेव बनून जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला.

मोहोळ येथील ज्योती क्रांती सामाजिक संघटनेचे प्रमुख रमेश बारसकर यांच्या पुढाकारातून लग्नाळू तरूणांनी स्वतः नवरदेवाचा पोशाख परिधान करून, डोक्याला मुंडावळ्या आणि फेटा बांधून, हतात कट्यार घेऊन आणि घोड्यावर विराजमान होऊन वरातीला साजेल असा मोर्चा काढला. वाजंत्रीसह निघालेल्या या मोर्चात २५ पेक्षा जास्त घोड्यांवर लग्नाळू तरूण बसले होते. त्याहून अधिक लग्नाळू तरूण नवरदेव होऊन पायी चालत होते.

रस्त्यावरून हा मोर्चा चालत असताना नागरिकांना हा मोर्चा नव्हे तर सामूहिक विवाह सोहळ्याची वरात असल्याचा भास होत होता. परंतु लग्नाळू तरूणांच्या हातात ‘ कोणी मुलगी देता का मुलगी लग्नासाठी ‘,   ‘ मुलींचा जन्मदर वाढवा ‘, ‘ गर्भलिंग तंत्रनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा ‘, ‘ सोनोग्राफी यंत्राचा दुरूपयोग करून मुलींना जन्माआधीच मारून टाकणा-या डॉक्टरांचा बंदोबस्त करा’ असे फलक होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा अनोखा मोर्चा पोहोचला तेव्हा नागरिकांची तेथे मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोलताना रमेश बारसकर यांनी मुलींच्या घटत्या जन्मदराचा गंभीर प्रश्न मांडला. देशात मुलींचा जन्मदर दरहजारी मुलांमागे ९४० आहे. तर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात तर मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे केवळ ८८९ आहे. शहरी व ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे ३०-३५ वर्षे पूर्ण होऊन चाळिशीकडे झुकत असतानाही तरूणांना मुलींचे स्थळ मिळत नाही. तरूणांच्या आई-वडिलांसाठी हा गंभीर प्रश्न बनत आहेत. वय वाढत असूनही लग्न जुळत नसल्यामुळे तरूणांमध्ये नैराश्य आणि व्यसनाधीनता वाढत असल्याचे मत बारसकर यांनी नोंदविले.