News Flash

प्रत्यक्ष आणि प्रतिमा

सध्या बाबा, स्वामी, महाराज यांच्या दांभिकतेच्या बातम्या सतत कानावर पडतायत.

एखादा माणूस समजून घेताना प्रत्यक्ष काय आहे आणि त्याची आपल्या नजरेतली प्रतिमा काय आहे याच्यातली सीमारेषा समजून घ्यायला हवी, जी बऱ्याचदा धूसर असते. ती एकदा समजली की पुढे होणारे गैरसमज टाळता येतात, अवास्तव अपेक्षा उरत नाहीत.. माणूस.. हा गुण दोषांनी युक्तच असतो.. त्याचे काही गुण आपल्याला भावतात. त्या गुणांकडे लक्ष द्यावं. पण म्हणून त्यात दोषच नाहीत असं मानू नये.

सध्या बाबा, स्वामी, महाराज यांच्या दांभिकतेच्या बातम्या सतत कानावर पडतायत. हजारो लोकांच्या समूहाला मंत्रमुग्ध करून ही मंडळी आपल्या प्रवचनातून श्रोत्यांच्या काळजाला हात घालतात, त्यांना एक प्रकारची ऊर्जा देतात, आधार देतात. तुरुंगात जन्माला येऊन अनेकांना मुक्त करणाऱ्या कृष्णाच्या गोष्टी सांगता सांगता ही मंडळी मग स्वत: तुरुंगात कशी जातात? प्रत्यक्षात ही मंडळी अशी का वागतात? असा भाबडा प्रश्न उगाचच मनात येतो. याचं उत्तर मात्र सोपं आहे. प्रत्यक्ष आणि प्रतिमा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत..

एखादा अभिनेता चित्रपटात चार सहा गुंडांना एकाच वेळी मारतो तोच अभिनेता कदाचित प्रत्यक्षात घरात शिरलेल्या चोराला धरूसुद्धा शकणार नाही. कारण चित्रपटात तो नायक असला तरी प्रत्यक्षात तो आपल्यासारखाच एक सामान्य माणूस असतो. भय, भीती या गोष्टी त्यालाही असतात. पण जेव्हा तो चोराला धरू शकला नाही याची बातमी होते तेव्हा आपल्याला हसायला येतं. कारण आपल्या लक्षात असते ती फक्त त्याची नायक म्हणून असलेली प्रतिमा..

आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या या मंडळींच्या बाबतीतही आपली हीच गफलत होते बहुधा. आपल्याला इतका छान उपदेश करणारा हा माणूस प्रत्यक्षातही तसाच वागणारा असेल अशी आपली समजूत व्हायला लागते. कारण आपल्याला आठवत असते ती त्याची प्रवचन देतानाची प्रतिमा.. ती प्रतिमा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण तेच प्रत्यक्ष समजतो. ते स्वाभाविक आहे. कारण अध्यात्म क्षेत्रामध्ये ‘प्रचीतीवीण बोलणे सारेचि कंटाळवाणे’ असं संतांनी म्हणून ठेवलंय.. त्यामुळे या बोलणाऱ्या मंडळींना प्रचीती आहेच असा आपला समज असतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेलाच आपण खरं मानायला लागतो.

‘नैनं दहति पावक:’ आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, या ओळीवर व्याख्यान देणाऱ्या ब्रह्मगिरी गोसाव्याची बाजेवर ठिणगी टाकून, त्याला आगीत सापडवून त्याच्या आध्यात्मिक प्रतिमेची आणि प्रत्यक्ष अनुभवाची परीक्षा गजानन महाराजांनी पाहिली होती.. आपण परीक्षा न करताच प्रतिमेला प्रत्यक्ष मानतो.

प्रतिमा आणि प्रत्यक्ष समान असणारे किंबहुना हे दोन्ही वेगळं नसणारे संत आता आहेत कुठे? ‘अंतरी असता नारायणे लक्ष्मीशी काय उणे’ असं मानणारे आणि प्रत्यक्ष तसंच वागणारे समर्थ आता कुठे भेटणार आहेत? हल्ली आपण कोणालाही झटकन पदव्या देत असतो. गुरू, श्रीगुरू, महागुरू, आचार्य.. पदव्या द्यायला हरकत नाही.. पण आपण पदवी दिली म्हणून ती व्यक्ती तशीच वागेल याचा काही भरवसा देता येत नाही. आचार्य.. केवढी मोठी पदवी आहे आणि केवढा अर्थ सांगणारी.. विनोबा म्हणाले होते, ‘‘जो बोलल्यासारखा आचरतो त्यालाच ही पदवी द्यावी. य: आचारवान् स: आचार्य:’’ ना पदवी देणारे आपण हा अर्थ लक्षात घेतो ना ही पदवी स्वीकारणारा.. ज्ञानेश्वर साकारायचे तर वरची वेशभूषा पुरेशी पडणार नाही, अंतरंगही बदलायला हवं, असं वाटणारे एखादेच शाहू मोडक असतात, विष्णुपंत पागनीस असतात.. ते प्रतिमेसाठी प्रत्यक्ष बदलायला तयार होतात.. आपला गोंधळ हा प्रतिमा आणि प्रत्यक्ष यातच असतो. ‘काय सुंदर गातात ते, पण स्वभाव विचारू नका,’ हे आणि अशी वाक्यंही आपला हा गोंधळच दाखवून देतात. गाणं, कला हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. चांगलं गाणारा माणूस म्हणूनही चांगलाच असेल, असं समीकरण नाही.. असावं पण असेलच असं नाही.. आपला संबंध प्रतिमेशी आहे का प्रत्यक्षाशी हा विचार करून, प्रत्यक्ष आणि प्रतिमा याच्यातली सीमारेषा समजून घ्यायला हवी.

एखादा शिक्षक प्रचंड कडक असतो. भीती वाटते त्याची आपल्याला.. पण काही कारणाने आपण त्यांच्याजवळ गेलो तर लक्षात येतं की ते स्वभावाने फार मऊ  आहेत. शिक्षक म्हणून कडक असणं हे मुलांसाठी चांगलं असतं म्हणून ती उभी केलेली प्रतिमा असते, पण प्रत्यक्ष मात्र वेगळं असतं. प्रथितयश मंडळींच्या पुस्तकांना तर यश मिळतंच पण त्यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला मागणी जास्त असते. आपण त्यांची प्रतिमा पाहत असतो तर जवळच्या माणसाने त्यांना प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. व्यक्तीकडे पाहताना विशेषकरून प्रथितयश व्यक्तीकडे पाहताना आपण समग्र व्यक्ती म्हणून पाहतो. म्हणून हा गोंधळ होतो.

मांडायचा मुद्दा एवढाच आहे की, एखादा माणूस समजून घेताना प्रत्यक्ष काय आहे आणि त्याची आपल्या नजरेतली प्रतिमा काय आहे याच्यातली सीमारेषा समजून घ्यायला हवी जी बऱ्याचदा धूसर असते. ती एकदा समजली की पुढे होणारे गैरसमज टाळता येतात, अवास्तव अपेक्षा उरत नाहीत.. माणूस.. हा गुणदोषांनी युक्तच असतो.. त्याचे काही गुण आपल्याला भावतात. त्या गुणांकडे लक्ष द्यावं. पण म्हणून त्यात दोषच नाहीत असं मानू नये. अध्यात्मापासून राजकारणापर्यंत आपण गुणांनी भारावून जाऊन व्यक्तीचं दैवतीकरण करत असतो. त्याला थेट देव्हाऱ्यात नेऊन ठेवतो.. आणि इथेच सगळी गडबड होते. व्यासांसारखं होता आलं पाहिजे, असं वाटतं. महाभारतातल्या व्यक्तिरेखा रंगवताना त्यांनी गुणदोषांचा फक्त काळा किंवा पांढरा रंग वापरला नाही तर प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वभावाचे वेगवेगळे रंग असतात हे लक्षात घेऊन सगळे रंग वापरले. म्हणून कोणाचंही दैवतीकरण केलं नाही. कार्यासमोर झुकावं, वयासमोर झुकावं, ज्ञानासमोर, अनुभवासमोर, कलेसमोर, गुणांसमोर नतमस्तक व्हावं.. आणि व्यक्तीसमोर झुकायचंच असेल तर त्याचे गुण आणि दोषही मान्य करून मग खुशाल झुकावं.. माणसात देव असतो नक्की, पण म्हणून माणूस म्हणजे देव नाही.. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला आधार वाटतो, बळ येतं त्याच्यामुळे.. पण म्हणून तो आपले प्रश्न सोडवण्याचा चमत्कार नाही करू शकत.. त्याला देव बनवू नये.. राम-कृष्णाने त्यांच्यावर आलेली संकटं दूर करताना कोणाचा धावा केला? गमतीत सांगायचं तर त्यांनी स्वत: धावाधाव केली. त्यांनी स्वत: प्रयत्न केले. टिळकांनी एका निबंधात फार छान म्हटलंय- रामाला प्रभू राम म्हणण्याऐवजी त्यांना राम प्रभू म्हणावं, कारण नावाच्या आधीच प्रभुत्व लावलं की त्या व्यक्तीचं कर्तृत्व आपण कमी करतो.. प्रत्यक्ष त्यांचं कर्तृत्व असामान्य असल्याने प्रभू अशी त्यांची प्रतिमा निर्माण होते.. पण त्यांचं प्रत्यक्ष कर्तृत्व आपण विसरतो आणि ‘तारणहार’ ही त्यांची प्रतिमा लक्षात घेऊन त्यांनी आपले प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा करतो..

भारतीय अध्यात्म हे रोकडा अनुभव महत्त्वाचा मानतं. गुरूने शिष्याची जशी परीक्षा करावी, तसं शिष्यानेही गुरूला आजमावावं अशी उदार आपली संस्कृती आणि म्हणूनच परीक्षा केल्याशिवाय कुणालाही आपल्या भविष्याचे मालक होऊ  देऊ  नये.. ही कथित बाबा मंडळी तर आपलं सुंदर परिपूर्ण अध्यात्म दूषित करत आहेतच पण दोष आपलाही आहेच की.. असो..

लेखाचा शेवट करताना आठवतायत ते जे. कृष्णमूर्ती यांचे शब्द.. जेव्हा त्यांना विचारलं की तुमचा शेवटचा संदेश काय आहे आमच्यासाठी? तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘‘please drop me when I am dead. Do not make a god out of me.’’ मी माणूस आहे, माणूसच होतो.. तेच प्रत्यक्ष आहे.. देव अशी माझी प्रतिमा बनवू नका..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2017 1:30 am

Web Title: how to understand other people
Next Stories
1 निर्व्याज
2 मी हरले..
3 चूकभूल
Just Now!
X