News Flash

चूकभूल

माणूस चुकतो.. किंबहुना जो चुकतो तोच माणूस आहे.

‘‘आई मी चुकलो’’ डोळ्यात दाटलेलं पाणी वाहू देत आकाश म्हणाला. आई काही म्हणणार इतक्यात बाबा म्हणाले, ‘‘आत्ता म्हणतोयस .. कशावरून पुन्हा असं वागणार नाहीस?’’ बाबांच्या या वाक्यामुळे शांत होत चाललेल्या आकाशच्या चेहऱ्यावर एक बारीकशी आठी आणि बरीचशी कळ उमटली. छान साय धरू लागलेल्या दुधात मिठाचा कण पडावा तसं ते बाबांचं वाक्य! भले चूक झाली असेल मुलाच्या हातून, तो कदाचित दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदाही चुकला असेल..पण..मी चुकलो म्हणण्यासाठी एक वेगळी शक्ती अंगात असावी लागते. धैर्य असावं लागतं, ते मुलाने दाखवलंय. हा विचार करून बाबांनी ते वाक्य उच्चारायलाच नको होतं.. मी चुकलो या वाक्यावर, ‘‘पुन्हा तू चुकशीलच’’ असं म्हणणं म्हणजे नवीन पालवी फुटू लागलेल्या रोपाला मुळापासून उपटून काढण्यासारखं आहे.

माणूस चुकतो.. किंबहुना जो चुकतो तोच माणूस आहे. पण त्याला आपली चूक कळणं आणि ती त्यानं उघडपणे मान्य करणं हे खरं शहाणपण असतं. अशा वेळी त्या सुधारू पाहणाऱ्या कोंबाला आपल्या उबेच्या ओंजळीत धरणं हे जवळच्या माणसाचं काम असतं. ‘चुकलो’ असं जर कोणी मनापासून म्हणत असेल तर त्याच्या खांद्यावर हात ठेवावा आणि त्याला म्हणावं, ‘‘अरे ठीक आहे, होतं असं, तुला कळलं ना..झालं तर मग.. म्हणजे हा खड्डा आता भरला, आता तो पुन्हा पडणार नाही याची काळजी घे.’’ असं उदारपणे सांगून त्याच्या विश्वासाला बळ देणं हे जवळच्या माणसाचं काम. त्याच्या मनात चुकीबद्दल अपराधीपण असतंच, ते लवकरात लवकर कसं घालवता येईल हे बघणं हे जवळच्या व्यक्तीचं काम.

चार पावसाळे जास्त पाहिलेल्या वडीलधाऱ्या मंडळींनी तर या संधीचा पुरेपूर वापर करत, त्याला उपदेश करतानाच.. ‘‘अरे हो! यात आमचंही जरा चुकलंच बरं का!’’ असं म्हणून मोकळं व्हावं आणि आपल्या चुकांचीही मोकळेपणाने कबुली द्यावी.. मोठी माणसंसुद्धा आपल्या चुका उघडपणे मान्य करतात हा खूप मोठा संदेश यातून पुढच्या पिढीला दिला जातो आणि दोन पिढय़ा त्यातून अधिक जवळ येऊ  शकतात. ‘मी चुकलो’ किती छोटंसं वाक्य.. पण खूप किमया करणारं. शाळेत असताना एकदा शाळा सुटल्यावर घरी आजी-आजोबांना न सांगता मी मैत्रिणीकडे गेले. तिथे आम्ही खेळात इतक्या रमलो की शाळा सुटून ४ तास उलटून गेलेत हेही मी विसरले. नंतर धावत धावत घरी आले. आजोबा भयंकर संतापले होते. घरात शिरताच पाठीत असा रट्टा दिला त्यांनी की मी कळवळले आणि मीही रागावले. ‘‘एक दिवस गेले खेळायला तर काय बिघडलं?’’ असा प्रश्न मी विचारला.. लहान तोंडी मोठा घास घेतला.. आणि आजोबा एकदम गप्प झाले.. आईने रात्री माझी चूक मला नीट समजावून सांगितली. माझ्या न सांगून जाण्यामुळे आजोबांना वाटलेली काळजी तिने मला सांगितली. मला खूप वाईट वाटलं. आईने दुसऱ्या दिवशी आजोबांना ‘चुकले’ म्हण असं सांगितलं. सकाळ झाली. आजोबांशी बोलायचा मी प्रयत्न केला, पण ते बोलले नाहीत. ते रागावलेत हे कळत होतं, पण ‘चुकले’ हा शब्द काही माझ्या ओठांवर येत नव्हता. चार दिवस गेले. आईने मला पुन्हा सांगितलं नाही. कारण ते मी स्वत:हून म्हणायला हवं होतं. आजोबा बोलत नव्हते. सगळे एकत्र जेवायला बसत होतो, पण वातावरण इतकं अवघडल्यासारखं झालं होतं की कुणीच कुणाशी मोकळेपणानं बोलत नव्हतं. मला हे सगळं खरं तर नको होतं. पण ‘चुकले आजोबा’ हे म्हणण्याने वातावरण बदलणार आहे का? असा माझा विचार! आणखी दोन दिवसांनी मलाच खूप अवघड वाटायला लागलं आणि घाबरत घाबरत आजोबांच्या समोर उभी राहिले, ‘‘आजोबा..’’ नकळत माझे हात जोडले गेले. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ‘‘चुकले आजोबा’’, असं म्हणताना मला हुंदका फुटला आणि समोर बघितलं तर माझ्या आधी आजोबाच रडत होते. हे दृश्यच मला नवीन होतं, आजोबा म्हणजे शिस्त, रागावणारे असंच चित्र होतं माझ्या डोळ्यासमोर. पण माझ्या चुकले म्हणण्याने तेही विरघळून गेले आणि माझ्या समोर ते रडू लागले. केवढी किमया केली एका शब्दाने. त्यानंतर आजोबांबद्दल जी भीती वाटायची तीही कमी झाली..आणि घरातला आनंदाचा, मोकळेपणाचा प्रवाह पुन्हा वाहायला लागला.

खरंच प्रवाहाच्या वाटेतले अहंकारांचे, अभिमानाचे खडक सहज विरघळवणारं वाक्य.. खऱ्या भावनेतून आलेलं ‘मी चुकलो’ या एका वाक्याने गैरसमज दूर होऊ शकतात. उसवलेली अनेक नाती पुन्हा सांधली जाऊ  शकतात. या चुकलो म्हणण्याने फक्त समोरचा विरघळतो असं नाही तर चुकलो म्हणणाराही दुसऱ्याचा विचार करायला लागलेला असतो. इतरांनाही मन आणि मत आहे आणि त्यांनाही विचार करण्याची क्षमता आहे हे त्यालाही जाणवायला लागतं. त्याचा अहंकार विरघळायला लागतो. त्याशिवाय तो ते म्हणूच शकणार नाही. अहंकारी व्यक्ती झटकन चूक मान्य करत नाही, आपण चुकलो नाही हे दाखवण्यासाठी ती त्या चुकीवरही काही तरी मुलामा चढवत राहते. यात प्रचंड शक्ती वाया जाते. चिडचिड होते त्यापेक्षा झाली चूक तर उघड मान्य करणे हे खरं शहाणपण! बरं आपण चूक केली म्हणून जगाची उलथापालथ तर होत नाही ना.. झाली चूक करावी मान्य.. चूक लक्षात आणून देणाऱ्याकडे रागाने बघण्यापेक्षा त्याचे आभार मानावेत. खड्डय़ात पडताना कोणी सावरलं आपल्याला तर आपण आभारच मानू ना. यात आपली शक्ती नाही वाया जात. फक्त झुकण्याची शक्ती आपल्यापाशी असावी लागते. दोन पावलं मागे येऊन का होईना, पण योग्य रस्ता मिळणार असेल तर काय हरकत आहे? आणि पश्चात्तापदग्ध हृदय असेल तर चूक मान्य करून माफी मागितल्याशिवाय चैनच पडणार नाही. शाकुंतलात नाही का शेवटच्या अंकात राजा दुष्यंत.. पश्चात्तापाने होरपळणारा दुष्यंत आपल्या पत्नीच्या शकुंतलेच्या पाया पडतो आणि चुकीची माफी मागतो.. दुष्यंत हा हस्तिनापूरचा सम्राट होता, शिवाय शकुंतलेचा पती होता. या दोन्ही गोष्टी त्याच्या झुकण्यात बाधा आणू शकल्या असत्या, पण त्याचं हृदय इतकं दग्ध झालंय, पोळलंय की आता माफी मागितल्यावरच त्याला विसावा मिळणार होता.

चूक आणि बरोबर असं १०० टक्के काही नसतंच. त्या त्या परिस्थितीवर चूक किंवा बरोबर अवलंबून असतं. त्यामुळे दर वेळेला तोच निर्णय योग्य असतो असंही नाही. चूक आणि बरोबर निर्णय नेमका करायचा कसा? विनोबांचा एक किस्सा आठवतोय.. एकदा विनोबांच्या कानावर एक गोष्ट आली, त्यांच्या आश्रमातला एक तरुण लपूनछपून विडय़ा ओढतो. आता बहुतेक त्या तरुणाला आश्रम सोडावा लागणार असंच सगळ्यांना वाटत होतं. विनोबांनी त्या तरुणाला बोलावलं.. आणि त्याच्या हातात चक्क विडय़ांचं पाकीट ठेवलं. म्हणाले, ‘‘अरे तुला विडी प्यावीशी वाटते ना. मग पी ना.. फक्त माझ्यासमोर पी. ज्या अर्थी तू लपूनछपून हे काम करतोस त्याअर्थी ते चांगलं नाही हे तुला कळतंय.. या घे विडय़ा..’’ त्याक्षणी त्या तरुणाच्या हातून ते पाकीट गळून पडलं, त्याला आपली चूकही उमगली. चुकलो म्हणण्याने ७० टक्के परिस्थिती सावरली जाते, पण ती चूक सोडून देऊन त्या व्यक्तीला प्रेमाने स्वीकारण्याने परिस्थिती १०० टक्के सावरली जाते, पण गंमत आहे ना.. ‘‘अपराध माझे कोटय़ानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी’’ असं त्या लंबोदराला सांगणारे आपण इतरांच्या मोठय़ा चुका पोटात घ्यायला तयार होत नाही. चूक ही अशोभनीय असली तरी ती शोभून दिसते.. कुठे? ..तर नदी जशी शेवटी सागरात जाऊन मिळते, सनाथ होते आणि शोभून दिसते तशी हातून घडलेली चूक समजूतदार व्यक्तीच्या पोटात शोभून दिसते..

‘चुकीला माफी नाही’ वगैरे वाक्य चित्रपटात ठीक असतात ..पण खऱ्या जीवनात क्षमेला पर्याय नाही.. शस्त्राने माणसाला धाकात ठेवता येतं, पण योग्य अयोग्य नीट सांगून त्यानंतर चुकलेल्याला केलेली क्षमा प्रेम निर्माण करते.. ‘फरगिव्ह अँड फरगेट’ हा एक सुंदर मार्ग आहे.. असो ..सुबह का भूला शाम को घर लौटता है तो उसे भूला नही कहते..

चूकभूल द्यावी-घ्यावी.. हेच खरं!

 

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 12:58 am

Web Title: kathakathan by dhanashree lele 2
Next Stories
1 जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर
2 तक्रार
3 इच्छापूर्ती
Just Now!
X