03 August 2020

News Flash

अतिझोप, आळस दारिद्रय़ास कारण

सकाळी लवकर उठावे आणि महत्त्वाची कामे करावीत अशी शिकवण मोठी माणसे कायम देत असतात.

सकाळी लवकर उठावे आणि महत्त्वाची कामे करावीत अशी शिकवण मोठी माणसे कायम देत असतात. रात्रीची आठ तासांची झोप दिवसभर ताजं राहण्यासाठी पुरेशी असते. वाटेल त्या वेळी झोपले तर आळस येतो शरीर काही करण्यास नकार देते. हे दुष्टचक्र सुरू होते, अनंत समस्या निर्माण होतात.

देशमुखांच्या घरातून हा संवाद हल्ली ऐकायला येतो. ‘‘स्वरा, अगं ऊठ बाई. दहा वाजलेत. लग्न झालं दोन महिन्यांनी की रोज बोलणी ऐकावी लागतील. आमचा उद्धार होईल तो वेगळाच.’’ आईच्या या रागावण्यावर स्वराचे उत्तर, ‘‘नऊ  वाजल्यापासून तुझी कटकट चाललीय, झोप कशी येईल कोणाला?’’ आईचे बोल ऐकून स्वरा उठली. फोन चार्ज केला नाही म्हणून तणतणली. दोन महिन्यांनी तिचं लग्न झालं. सासरे आठ वाजता जेवणाचा डबा घेऊन जायचे. नवरा संतोष साडेनऊला नाश्ता करून जायचा. झोपेतच स्वरा त्याला बाय करायची. महिनाभर सर्वानी याचे निरीक्षण केले. सून आली खरी पण झोप घेऊनच. तिचा आळस दारिद्रय़ तर आणणार नाही ना,  असा विचार करून शनिवारी सुटी होती तरी संतोषने सहा वाजता स्वराला उठवले. आजपासून रोज तिची कामे तिनेच केली पाहिजेत असे बजावले. गेल्याच आठवडय़ात झोपून राहिल्यामुळे ती एक चांगला इंटरव्ह्य़ू देऊ  शकली नव्हती. आपली झोप, आपला आळशीपणा फार नुकसान करेल, घरातील माणसे नाराज राहतील हे तिच्याही लक्षात आले आणि तिने लवकर उठायला सुरुवात केली. घरातली समाधान नांदलं.

सात आळशांची प्रसिद्ध गोष्ट सर्वानाच माहीत आहे. तसा निखिल हा शिकलेला आळशी, झोपाळू मुलगा एका फॅक्टरीमध्ये प्रॉडक्शन विभागात शिफ्ट डय़ुटी करीत असे. निखिल रात्रपाळी करून आला की दिवसभर झोपून राही, तरीही संध्याकाळी उठून फ्रेश होऊन कामाला जाणे त्याच्या अगदी जिवावर येई. आठवडय़ातून दोन वेळा तरी तो कामाला न जाता आळसात वेळ काढत असे. लांब राहणाऱ्या आईला वाटले याचे लग्न केले तर बायको याला वेळेवर कामाला पाठवील. त्याचे लग्न झाले, बायको प्रीती हौशी होती. नवलाईचे दिवस संपले. तिने त्याच्या कामाच्या वेळा, आवडीनिवडी, बाजार, बँक वगैरे गोष्टी समजावून घेतल्या. सुरुवातीच्या दिवसात तीन-चार हाका मारल्या की झोपलेला निखिल जागा होई. सगळ्या वस्तू हातात आयत्या मिळत होत्या. तरी अगदी संकट आल्याप्रमाणे कामाला जाई. प्रीतीने उठायला सांगितले की, लहान मुलासारखे तो बहाणे करायचा. फालतू कारणे देऊन कामाला जाणे टाळत असे. बिनपगारी रजा होऊ  लागली. हातात पैसे कमी येऊ  लागले. घर चालवणे प्रीतीला अवघड होऊ  लागले. त्यातच नव्या पाहुण्याचे आगमन झाले.

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ अशी परिस्थिती झाली. अतिझोपेमुळे निखिलला जबाबदारीची जाणीवच राहिली नाही. दागिने, घरातील वस्तू विकून प्रीतीने कसेबसे थोडे दिवस काढले. अशक्य झाल्यावर तिने सासू-सासरे, आई-बाबा सर्वाना निखिलची अतिझोप, आळस यामुळे नोकरी जाण्याची वेळ आली आहे हे सांगितले. मुलाचे हाल, उपासमार, ओढवून घेतलेले दारिद्रय़ यात खितपत राहणे मला जमणार नाही असेही तिने सांगितले.

तिने निघून जाण्याची तयारी केल्यावर निखिलचे डोळे उघडले. झोप, आळस झटकून काम करण्याचे, पैसे कमावण्याचे वचन दिले. मुलाला सांभाळून संसाराला हातभार लावण्याची तिची तयारी होतीच, पण नवऱ्याचा झोपाळूपणा, आळस यामुळे आलेल्या आर्थिक ओढगस्तीला तोंड देण्यासाठी नव्हे, तर मुलाचे भविष्य घडविण्यासाठी लागणाऱ्या जास्त  पैशांची तजवीज करण्याकरिता होती. परिस्थिती कठीण झाल्यावर का होईना निखिलचे डोळे उघडले.

 गीता ग्रामोपाध्ये – geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2016 1:01 am

Web Title: over sleeping not good for health
Next Stories
1 विश्वास
2 परिस्थितीवर मात
3 सुहास्य तुझे..
Just Now!
X