सर्व माता-पित्यांस (होऊ घातलेल्याही) एक पत्र…
एका दोस्तानं पाठवलं असं समजा…
परवाच पाठवणार होतो… पण काल शुभेच्छा द्याव्या लागल्या असत्या आणि शुभेच्छा देण्यासारखं माझ्याकडे काही नव्हतंच काल,
belated ही देत नाही…
कारण द्याव्याशाच वाटत नाही शुभेच्छा…
परवा पतंग उडवताना काही जण गच्चीवरून पडले,
काहींचे हात-पाय मोडले, काही कायमचे हे जग सोडून गेले.
काहींचे गळे कापले त्या मांजाने, ते जगायची धडपड करतायत…
कसले हे पतंग, जीवघेणे, जीव जाईस्तोवर कसले पतंग उडवतायत ही मुलं? आणि त्यांना आपलं प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य..?
गच्चीवर आपल्या मुलाला पतंग उडवायला आपण पाठवतो,
परवानगीही देतो म्हणजे ‘जा बाबा मर, जगलास तर ये परत’ असंच नाही का यातून प्रतित होत..?
गच्चीवर पतंग उडवायला बंदीच घातली पाहिजे.
मैदानातही नको. गळे कापतात एकमेकांचे आणि नाही उडवला पतंग तर काय फरक पडतो असा मुलाच्या आयुष्यात..?
सांगा, नको उडवू पतंग म्हणून चिडेल, रुसेल दोन दिवस.. पण स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाचा धोका तर टळेल..
ते जास्त महत्त्वाचं नाही का…?
हा कोण उपटसुंभ उगाचच पत्र लिहून
शहाणपणा शिकवतोय…?
पण बघा ना.. आता रंगपंचमी (की होळी?) येईल.
सुरू सगळे रंग उधळायला..
डोळे जाईस्तोवर, infection होईस्तोवर,
त्वचेचे आजार होईस्तोवर कसले ते रंग खेळणे?
एकमेकांना फुगे काय फेकून मारतात,
सरकारला नावं ठेवत नियम मोडत ट्रीपल सीट काय फिरतात…?
याच्यामध्ये उत्पादक ते काय..?
एकमेकांच्या अंगावर वॉर्निश फेकून (लावून)
चिखल फेकून सण साजरे करण्याची ही कुठली जंगली पद्धत..?
सण करावा ना साजरा, पण त्याचं औचित्य ठेवून…
ते राहतं बाजूला आणि धुळवडच सुरू होते..
अजून आहे, ऐका तर खरं.. मागाहून दिवाळी येईल. फटाके फुटतील..
कुणाचे डोळे जातील, कुणाचे हात-पाय भाजतील, काहींना कानाचे आजार होतील,
पण नाही, करायचंच सगळं.
सोसायटय़ांमध्ये तर तथाकथित फ्लॅटधारक
गाडय़ा बाजूला लागल्या आहेत, त्यात पेट्रोल-डिझेलच्या टाक्या आहेत तिथंच फटाके उडवतात.
एखादा पेट्रोल-डिझेल टँक पेटला, फुटला तर काय अरिष्ट कोसळेल याची नुसती कल्पना करा..
त्यात किती जणांचा जीव जाईल, कदाचित आपलंही कुणी असेल.. नाही का?
स्वत:च्या चारचाकीपासून लांब उडवायला सांगायला
विसरत नाहीत.. दुसऱ्याची गाडी पेटली
तर पेटू दे असाच अर्थ ना त्याचा..?
त्यात गाडी नसली एखाद्याकडे तर बाकी
गाडय़ावाल्यांसाठी हे तर कर्दनकाळच की?
हेच बघा ना! दहीहंडी (की गोविंदा?)
हात-पाय मोडेस्तोवर, डोक्याला मार लागून स्मृतिभ्रंश, मृत्यू पडेपर्यंत सण साजरे होतायत.
कुमारवयात एखादा जायबंदी झाला तर या सणानं काय दिलं..?
आपला सहकारी हात-पाय गमावून घरात बसलेला असतो आणि बाकी पुढच्या वर्षी तेच करत असतात..
कुणाला काहीच पडलेलं नसतं..
एक जाता-जाता सांगतो..
रस्त्यावर क्रिकेट खेळणे म्हणजे ‘आम्ही मरायला तयार आहोत. तुम्हाला आम्हाला वाचवायचं तर वाचवा’ हेच घोषवाक्य घेऊन खेळताना दिसतात.
रस्त्यावरून धावणाऱ्या भरधाव गाडय़ा आणि यांचं क्रिकेटचे पॅशन शिगेला गेले की मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही हा खेळ रस्त्यावर खेळला जातो.
रस्त्यावर क्रिकेट खेळायला एखादे आई-वडील परवानगी देतातच कसे? आणि न देता तो खेळला तर सहन करतात तरी कसे?
‘कॅच’ पकडण्यासाठी (?) मागे-मागे जाऊन गाडीखाली आल्याची अनेक उदाहरणं आहेत.
पण जर वाचलाच तर त्याचे इतर सवंगडी एकत्र येऊन त्या गाडीचालकालाच दम देतात,
‘दिसत नाही का आम्ही रस्त्यावर खेळतोय?’
हे किती बरोबर आहे?
यामध्ये सण साजरे करणे, खेळणे हे वाईट आहे असा वास काही ‘ज्ञानी’ लोकांना येऊ शकतो.
सणाचं महत्त्व त्याची गरिमा जोपासावी, त्याचा आनंद घ्यावा, त्याचं दिवशी दु:खद बातमीला सामोरं जायला नको याची जरी काळजी प्रत्येकानं घेतली आपण तर सण साजरा झाला असं म्हणता येईल आपल्याला.
सगळं जरा जपून केलं, काळजीपूर्वक केलं तरच संक्रांतीचे तीळ गोड लागतात, दिवाळीचे लाडू लज्जत देतात, रंगाची जादू अनुभवता येते, दहीहंडी फोडल्याचा आनंद घेता येतो आणि षटकाराची मजाही घेता येते..
माहीत असलेलेच पुन्हा सांगतो, नाही ऐकत कुणी तर त्याला परत परत सांगा..
ड्रेनेजच्या झाकणावर पाय ठेवू नये, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाला हात लावू नये, मुला-मुलींनी शाळा, कॉलेजला जाताना पक्ष्यांच्या थव्यासारखं एका रांगेत
सायकली (गाडय़ाही) चालवू नये आणि कितीही भारी फोन असला तरीही हेडफोन लावून रस्त्यावर येऊ नये.
कळावे,
एक दोस्त, माणूस, नागरिकसुद्धा…
ता. क.
सण, धार्मिकता त्याचं अधिष्ठान जपलंच पाहिजे. पण ते जपण्यासाठी आपली मुलं जगली पाहिजेत, याची काळजी वाटली म्हणून हा पत्रप्रपंच.
धन्यवाद…!
– मिलिंद शिंदे