एकिकडे पद्मावती चित्रपटाचा वाद आणि त्याचे प्रदर्शन यांविषयी बॉलिवूडमधील वातावरण तापलेले असताना आता २.० या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता तो २७ एप्रिल रोजी प्रदर्शित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाआधीच बिग बजेटमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. तसेच चित्रपटाचे काही पोस्टर्सही याआधी प्रदर्शित झाले होते. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. याआधी हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा होत्या. मात्र चित्रपटात महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांनी तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमारचे पॅडमॅन व २.० चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यास त्याचा चित्रपटाला फटका बसू शकतो असे निर्मात्याकडून सांगण्यात आलं.

४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दुबईमध्ये या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा दिमाखदार कार्यक्रम पार पडला होता. विशेष म्हणजे यातील तंत्रज्ञांपासून ते स्पेशल इफेक्ट्सपर्यंत प्रत्येक गोष्ट ही भारतातील असणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमारचा लूक यामुळे चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठ्याप्रमाणात उत्सुकता आहे. याबरोबरच चित्रपटात अभिनेत्री अॅमी जॅक्सनचीसुद्धा भूमिका आहे. हा चित्रपट महागड्या चित्रपटांपैकी एक असेल असेही बोलले जात आहे.