करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह सुरु होण्यास आणखी बराच वेळ लागणार आहे. परिणामी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांनी प्रदर्शनासाठी आता OTT प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. याच दरम्यान डिस्ने हॉटस्टारने एका वर्चुअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आगामी सात चित्रपटांची घोषणा केली. मात्र ही कॉन्फरन्स चित्रपटांपेक्षा त्यात सामिल न केल्या गेलेल्या कलाकारांमुळेच जास्त चर्चेत आहे. आधी अभिनेता विद्युत जामवाल आणि कुनाल खेमु यांनी याबाब नाराजी व्यक्त केली होती अन् आता अभिनेत्री आहना कुमरा हिने देखील हॉटस्टारच्या या कॉन्फरन्स विरोधात आवाज उठवला आहे.

आहना कुमरा ‘खुदा हाफिज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट आता हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. मात्र असे असतानासुद्धा आहनाला त्या डिजिटल कॉन्फरन्समध्ये सामिल केलं गेलं नाही. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “विद्युतचं ट्विट वाचल्यानंतर मला या कॉन्फरंसची माहिती मिळाली. हॉटस्टारने सात चित्रपटांची घोषणा केली पण पाचच चित्रपटांच्या कलाकारांना प्रमोशनसाठी बोलावलं. उर्वरीत दोन चित्रपटांचं प्रतिनिधित्व कोणीही केलं नाही. अर्थात या मंडळींना प्रश्न विचारुन फायदा नाही कारण आमच्या प्रश्नांची उत्तर इथे कोणीही देणार नाही.” यापूर्वी विद्युत जामवाल आणि कुनाल खेमु यांनी देखील ट्विटरद्वारे अशीच नाराजी व्यक्त केली होती.