बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर मिलिंद सोमण यांनी करोनावर मात केल्यानंतर आता लोकांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. अभिनेता मिलिंद सोमण यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून स्वतःचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिलीय. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय.

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेते मिलिंद सोमण यांनी लिहिलंय, “आता मी पुर्णपणे बरा झालोय आणि मी पुढच्या १० दिवसांत प्लाझ्मा दान करणारेय…जेणेकरून अनेक करोना रूग्णांना करोनाशी सामना करण्यासाठी आणि त्यांचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतील…शांत रहा आणि काळजी घ्या…आणि जे जे शक्य आहे ते नक्की करा…!”

अभिनेते मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते दोन्ही हातात मुग्दर पकडून व्यायाम करताना दिसून येतायत. ब्लॅक टी शर्ट आणि बॉक्सरमध्ये असलेले अभिनेते मिलिंद सोमण हातातले दोन्ही मुग्दर डोक्यांपर्यंत फिरवत व्यायाम करत आहेत. या व्हिडीओ व्यतिरीक्त त्यांनी फोटो देखील शेअर केलाय, ज्यात व्यायाम करताना त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलही दिसून येतेय.

अभिनेते मिलिंद सोमण यांची कोव्हिड टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी हा व्यायामाचा व्हिडीओ शेअर केलाय.

याव्यतिरीक्त त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना जागरूक केलंय आणि याची बरीच चर्चाही झाली होती. “काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचं करोनामुळे निधन झालं. त्याचं वय ४० इतकं होतं… त्याचं जाणं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं…खूप लोकांनी मला विचारलं की, तु स्वतःला इतकं फिट ठेवतोस. मग तुला कसा करोना झाला…? पण माझं असं मत आहे की, जर तुमचं फिटनेस आणि आरोग्य उत्तम असलं तर करोनाशी सामना करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते…पण ते तुम्हाला लागण होण्यापासून थांबवू शकत नाही.”, असं या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय.