दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील सहकलाकार संदीप नाहरचा मंगळवारी मंगळवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी संदीपने सोशल मीडियावर एक सुसाईड नोट आणि व्हिडीओ शेअर आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी आता पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट सादर करत संदीपने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्याच्या हत्येचं वृत्त फेटाळलं आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

संदीपने त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर संदीपची पत्नी कांचन आणि त्याच्या मित्राने त्याला गोरेगावमधील एका रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

“संदीपने त्याच्या बेडरुमचं दार आतून बंद केलं होतं. त्यामुळे कांचनने दार ठोठावत संदीपला बाहेर येण्यास सांगितलं. परंतु, आतून संदीपचा आवाज येत नव्हता. त्यामुळे कांचनने चावी करणाऱ्याला आणि घर मालकाला बोलावून घेतलं. त्यानंतर बेडरुमचं दार उघडल्यावर संदीप छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला”, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

संदीपवर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी त्याचे वडील आणि भाऊ गोरेगाव पोलीस स्टेशनला त्याच्या मृतदेहावर दावा करण्यासाठी गेले होते. परंतु, आतापर्यंत कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही. तसंच प्राथमिक सूचनेच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आणि शिवविच्छेदनाचा अहवालाची वाट पोलीस बघत आहेत,  असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.

संदीपने एम.एस.धोनी चित्रपटासोबतच अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ (Kesri) या चित्रपटातही काम केलं होतं. तसंच त्याने काही मालिकांमध्येही विविध भूमिका साकारल्या होत्या.

काय लिहिलं होतं या सुसाईड नोटमध्यें?

“आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”. शेवटी संदीपने एक विनंती करताना, “एक रिक्वेस्ट है…मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना”, असं संदीपने सुसाइड नोटमध्ये नमूद केलं होतं.