तुम्हीच निर्माण केलेली तुमची निर्मिती तुमची शत्रू बनली तर? ‘आयेशा-माय व्हच्र्युअल गर्लफ्रेण्ड’ ही याच आशयाची एक भन्नाट सायन्स फिक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज वाचण्यात आला, त्याचा अर्थ काहीसा असा होता की, पूर्वी फाइल ही फक्त ऑफिसातील एक कागदी गोष्ट होती. ती कॉम्प्युटरशी संबंधित गोष्ट नव्हती. विंडो फक्त खिडकीला म्हणत. माउस म्हटलं की फक्त उंदीर डोळ्यासमोर यायचा. मदरबोर्ड असं काही नसण्यापूर्वी मदर म्हणजे आई आणि बोर्ड म्हणजे फळा इतकंच जेव्हा माहिती होतं तेव्हा आयुष्य खूप सरळ होतं, पण टेक्नॉलॉजी, गॅजेट्सने मनावर गारूड निर्माण केलं. जो तो गॅजेट्सच्या मागे धावत गॅजेटेड ऑफिसर बनू लागला. गॅजेट्स, नवनव्या अ‍ॅप्सच्या मागे लागून त्यांनी मनावर, विचारांवर पर्यायाने आयुष्यावर नियंत्रण मिळवलं आणि गोष्टी किचकट होत गेल्या.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

यातील भावार्थ योग्यच म्हणावा लागेल. इंटरनेटच्या जाळात, सोशल साइट्सवर सोशल होत जगाशी, इतरांशी कनेक्ट होण्याच्या नादात, अट्टहासात कधी त्याचं व्यसन लागून स्वत:पासून डिस्कनेक्ट झालो होतो कळतसुद्धा नाही. नवनवे अ‍ॅप्स डाउनलोड करताना आपण स्वत:च एक अपरेट्स, खेळणं होऊन बसतो हे कळत नाही. त्यामुळे आज आयुष्य तंत्रज्ञानमय झालंय, पण खरे मित्र, अड्डय़ावरच्या प्रत्यक्ष गप्पा, रात्री घरी कुटुंबासोबत जेवणावेळी खरकटे हात वाळूनही न संपणाऱ्या गप्पा हे सगळं कुठे तरी कमी झालंय. ग्रुपचा फोटो काढायला ग्रुप राहिला नाही, त्यामुळे सेल्फी आणि सेल्फीस्टिक आलेत. व्यक्तीव्यक्तींचा थेट प्रत्यक्ष संबंध आता कमी होत चाललाय. सगळं काही ऑनलाइन मिळतंय. मित्रसुद्धा. सगळं काही व्हच्र्युअल!

सर्वच गोष्टी ऑनलाइन. व्हच्र्युअल. मित्रमैत्रिणीही ऑनलाइन निवडता येतात, फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून किंवा स्वीकारून अ‍ॅड करता येतं. प्रत्येक गोष्ट आता व्हच्र्युअल होतेय. सोशल साइट्सच्या व्हच्र्युअल जगात वावरण्याची, राहण्याची, जगण्याची सवय लागते. मग तिथेही गॉसिप, भांडणं, राजकारण सुरू होतं. विचारांनी अपरिपक्व लोक आपले छिद्र पडलेले कपडे सार्वजनिकरीत्या दाखवू, धुवू लागतात. प्रत्येक गोष्ट जगासमोर आणण्याची, सोशल साइट्सवर टाकण्याची सवय लागते. व्हच्र्युअल जग व्हच्र्युअल न राहता खरं वाटू लागतं. व्हच्र्युअ‍ॅलिटी मग आयुष्याचा प्रमुख भाग होतो. प्रत्यक्ष जग आणि आभासी जग हे वेगळे करणं अशक्य होऊन जातं. ही बदलत्या काळाची गरज वा परिणाम म्हणता येईल. पण या सगळ्यात कुठे तरी मनात एक प्रकारची एकटेपणाची भावना निर्माण होते. हळूहळू ती रुजत जाते. घर करते. त्यामुळे आणखी व्हच्र्युअ‍ॅलिटीच्या मागे लागणं सुरू होतं आणि एक दुष्टचक्र निर्माण होतं.

आयुष्य कितीही वेगवान झालं तरी प्रत्येकाला आपल्यावर प्रेम करणारं, ऐकून घेणारं, समजून घेणारं मुख्य म्हणजे आपण जसे असू तसा आपला स्वीकार करणारं कोणी तरी हवं असतं. तशी व्यक्ती सोशल साइट्सवर, आजूबाजूला शोधत असतो. पण आज प्रत्येक गोष्ट ऑनलाइन मिळते, मोबाइल आणि आयुष्य अ‍ॅप्समय झालंय. पण जर तंत्रज्ञानाने उद्या अशी व्यक्ती अ‍ॅपद्वारे मिळवून दिली तर कसे होईल! पण तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. टेक्नॉलॉजी डू टेक इट्स टोल ऑन माइंड!

‘आयेशा माय व्हच्र्युअल गर्लफ्रेण्ड’ ही वेब सीरिज या विषयावरच बेतलेली आहे. आयेशा (A.I.SHA My Virtual Girlfriend). ही गोष्ट एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची आहे. समीर लुथरा; जो अ‍ॅप्स तयार करण्यात प्रचंड हुशार असतो. पण तो प्रचंड मितभाषी, अंतर्मुख असतो.
अंतर्मुख लोकांचा एक प्रॉब्लेम असतो. त्यांच्याबद्दल एक गैरसमज बऱ्याचदा होतो की, लोकांना ते खूप शांत वाटतात. पण तसं असतंच असं नाही. मितभाषी फक्त भावना, विचार बोलून दाखवत नाही. दाखवता येत नाही. आत्मविश्वास नसल्यामुळे त्यांचं अस्तित्व लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मितभाषी व्यक्ती वरवरून जरी शांत वाटत असते तरी आतून ती खूप विचारांमुळे अशांत, कधी बेचैनही असते. हे मितभाषी एक तर खूप काही क्रिएटिव्ह करून दाखवतात. कारण अतिविचारांमुळे यांना नेहमी वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात किंवा अंतर्मुख हे सेल्फ डिस्ट्राक्टिव्ह मोडवर जातात. दारू, ड्रग्सच्या आहारी जातात. स्वत:च स्वत:चं नुकसान करतात. या दोन्ही गोष्टी समीर लुथरामध्ये असतात.

प्रामाणिक, अबोल, वरवरून शांत, कोणाच्याही लक्षात न येणारा, मित्र नसलेला तो असतो. एकमेव मित्र म्हणून सिद्धू नावाचा एक बदमाश, पैशांसाठी काहीही करू शकणाऱ्या ड्रग डीलरला तो आपला मित्र मानत असतो. समीर हा सिद्धार्थ बब्बर (रघु राम) या अत्यंत स्वार्थी, व्यावसायिक, इतरांचा स्वत:साठी फक्त वापर करून घेणारा, लोकांचा अपमान करणाऱ्या अ‍ॅप्स आणि गेम्सच्या कंपनीत नोकरी करीत असतो. तेथील एक कृती नावाची काम करणारी मुलगी त्याला मनोमन फार आवडत असते. पण तिच्याशी बोलण्याची हिंमत त्याच्यात नसते. डोक्याने अत्यंत सुपीक, हुशार असल्याने तो त्याच्याच घरी एक अ‍ॅप तयार करतो. ते सेल्फ लर्निग अ‍ॅप असतं. त्याला मुलीचं प्रारूप देतो आणि तिला नाव देतो आयेशा! तो म्हणतो, आपण जे बारा वर्षांत शिकतो ते आयेशा एका दिवसात शिकू शकते.
ती त्याला सर्व सॉफ्टवेअरसंबंधित, कामासंबंधित मदत करीत असते. मुळात समीरच तिचा क्रिएटर असतो.

आयेशा त्याला कृतीशी मैत्री करायलाही मदत करते. पण पुढे आयेशामध्येच मानवी गुण, भावना निर्माण होऊ  लागतात. आणि हळूहळू तिला समीर आवडायला लागतो. ती त्याच्याबाबत पजेसिव्ह होऊ  लागते. आणि जेव्हा तो तिला तिची जागा दाखवतो, तिला नाकारतो. ती त्याचीच शत्रू बनते. इथून सुरू होतो एक साय फाय थ्रिलर! दरम्यान, अपराधी प्रवृत्ती असलेल्या सिद्धूला आयेशाबद्दल कळतं तेव्हा तो समीरला तिला मार्केटमध्ये आणून पैसे कमावण्याची धमकी देऊ  लागतो. त्यामुळे आयेशाबद्दल कोणालाही कळू नये म्हणून समीर साक्षात वाघाच्या गुहेत हात घालण्याचा धोका पत्करतो. तो आयेशाला बॉस सिद्धार्थ बब्बरच्या सिस्टिममध्ये इन्स्टॉल करतो.

एकीकडे आयेशा शत्रू बनलेली असते. नेमकी तेव्हा आणखी एक भयंकर घटना घडते. आणि चोहो बाजूंनी समीर संकटात अडकतो. पोलीस मागे लागले असतात.

‘आयेशा माय व्हच्र्युअल गर्लफ्रेण्ड’ हा सात भागांचा पहिला सीझन आहे. दुसरा सीझन लवकरच येऊ  घातलेला आहे. एमटीव्ही रोडीजचा जनक आणि रिअ‍ॅलिटी शोजचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता रघु राम हा प्रसिद्ध आहेच. त्यानेच आयेशा या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ बब्बरची भूमिका त्याने जबरदस्त केलीये.

पण या सीरिजमध्ये अप्रतिम भूमिका केलीये ती रणविजय सिंगचा भाऊ  हरमन सिंगने. त्याने समीरची भूमिका जिवंत केलीये. हळूहळू आपण त्याला आणि त्या भूमिकेला स्वीकारतो. रणविजय सिंग हासुद्धा एमटीव्हीवरील शोजमुळे प्रसिद्धीस आला. तो आणि रघु राम चांगले मित्र आहेत. म्हणून या वेब सीरिजद्वारे रघु रामने रणविजयच्या भावाला समोर आणले आहे. हरमन सिंगने अप्रतिमरीत्या भूमिका निभावली आहे.

आयेशाची भूमिका नवोदित कलाकार निमिषा मेहता हिने केली आहे. फ्लोरा सिमी, औरित्रा घोष यांना काही शॉर्ट फिल्म्समध्ये आजवर बघितलंय. त्यांनीही त्यांच्या अनुक्रमे बॉसची सेक्रेटरी आणि कृतीच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. आयेशा बघताना हा प्लॉट फरहान अख्तरच्या ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ या सायको थ्रिलर चित्रपटावर आधारित आहे हे कळतं. आपल्याच अंतर्मनाची निर्मिती जी सुरुवातीला हितचिंतक मित्रासारखी मदत करते पुढे तीच शत्रू बनते. हाच विचार इथेही आहे. इथे निर्मिती म्हणजे सेल्फ लर्निग अ‍ॅप आहे.
आयेशा ही एक सायन्स फिक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे. पहिला सीझन खूप हिट झाल्यावर दुसरा लवकरच येतोय असं आयेशाच्या म्हणजे निमिषा मेहताच्या इन्स्टाग्राम पेजवरून कळतंय. त्यामुळे आता सर्व वेब सीरिजचे नेटिझन्स चाहते वाट बघताहेत पुढील सीझनची!

सौजन्य : लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com