जुहू चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना आणि मनसेने शनिवारी गुढीपूजनाचे आयोजन केले होते. उभयतांनी बॅनर्सबाजी करीत या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवतण नागरिकांना दिले होते. प्रथम शिवसैनिकांनी हजेरी लावून गुढीपूजन केले. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे बॅनर्स गायब झाले आणि जुहू चौपाटीत दाखल झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या हस्ते गुढीपूजनाचा सोहळा उरकून घेतला. मात्र शिवसेना आणि मनसेचा हे गुढीपूजन जुहूवासीयांच्या स्मरणात राहणार आहे.
शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शनिवारी जुहू चौपाटीवर गुढीपूजनाचे आयोजन केले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा उत्साहात गुढीपूजनाची तयारी केली होती. मनसेने तर जुहू चौपाटीवर १०० फूट गुढी उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुढीपूजनाबाबत बॅनर्सही झळकविले होते.
शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळीच जुहू चौपाटीवर दाखल झाले. खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते येथे गुढीपूजन करण्यात आले. जुहू चौपाटीवरून खासदार निघून गेल्यानंतर शिवसैनिकही पांगले. त्यानंतर अचानक शिवसेनेचे बॅनर्स उतरविण्यात आले. चोहीकडे केवळ मनसेचे बॅनर्स झळकताना दिसत होते. जुहू चौपाटीवर १०० फूट उंच गुढी उभारण्यात आली. एका क्रेनच्या साहाय्याने या गुढीचे पूजन करण्यात येणार होते. पूजनासाठी यजमान अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन जुहू चौपाटीवर पोहोचले. पण, क्रेनमधून गुढीपर्यंत पोहोचण्यास त्यांनी नकार दिला. अखेर बच्चन दाम्पत्याने छोटय़ा गुढीचे पूजन केले आणि मनसेचा सोहळा उरकला.