सौंदर्याची खाण म्हणून ओळख असलेली माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. वय हा निव्वळ आकडा असतो हे ऐश्वर्याकडे पाहिल्यावर कळते. अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी २००७ साली तिचा विवाह झाला. त्यांना आराध्या ही गोंडस मुलगी आहे. बॉलीवूडला हिट चित्रपट देणा-या अभिनेत्रीने लग्नानंतर ‘जज्बा’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण केले. त्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आहे.
मिस वर्ल्ड म्हणून नावाजलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. सुरुवातीच्या काळात अॅशच्या वाट्याला आलेल्या चित्रपटांमुळे तिला यश मिळाले नव्हते. ऐश्वर्या राय बच्चन हिंदीशिवाय विविध भाषांमधल्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. एका चांगल्या अभिनेत्रीसोबतच ऐश्वर्या एक चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. अॅशने शास्त्रीय नृत्याचे रितसर प्रशिक्षणही घेतले आहे. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने सांगितले होते की, ‘मला आर्किटेक्ट बनायचे होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. हा माझ्यासाठी एक दुसरा पर्याय होता. कुतुहल म्हणून मी अभिनयाकडे वळली होती’, असे तिने स्पष्ट केले होते. अॅश आणखी एका कारणामुळे चर्चेत होती ते म्हणजे बॉलिवूडमधील तिची प्रेमप्रकरणे. विविय़ध सहकलाकारांसोबतही अॅशचे नाव जोडले गेले होते. ज्यापैकी सलमान खान आणि तिच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणाला बरीच हवा मिळाली होती.
‘धूम’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके समन’, ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘उमरावजान’, ‘देवदास’ यांसारख्या विविध चित्रपटांतून ऐश्वर्याने चाहत्यांवर एक प्रकारची जादूच केली आहे. अॅशने ‘पारो’ ही भूमिका साकारलेल्या ‘देवदास’ या चित्रपटाला मिलेनिअम मासिकाने १० सर्वश्रेष्ठ चित्रपटांच्या यादीत एक स्थान दिले होते. बऱ्याच काळानंतर करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने साकारलेल्या ‘सबा’च्या भूमिकेला प्रेक्षकांनीही पसंत केले होते. या चित्रपटात विशेष गाजली ती म्हणजे रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चनची हॉट केमिस्ट्री. अापल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनचे हे काही फोटो..