करोना विषाणूला लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक कसोशीने प्रयत्न करत आहेत. यामध्ये पोलीस, डॉक्टर्स, वैद्यकीय सेवेतील अन्य कर्मचारी आणि सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. मात्र देशासाठी, देशातील प्रत्येक नागरिकासाठी जीवाचं रान करणाऱ्या या व्यक्तींवर बऱ्याच वेळा काही नागरिकांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. काही ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी हल्ला केला. तर काही रुग्णालयात रुग्णांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याचं दिसून आलं. या प्रकरणी अभिनेता अजय देवगणने संताप व्यक्त केला आहे.  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत त्याने राग व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी काही नागरिकांनी एका डॉक्टरवर हल्ला केला होता. त्यामुळे अजय संतापला आहे. “काही सुशिक्षित लोकांनी एका माहितीच्या आधारे शेजारील डॉक्टर कुटुंबावर हल्ला केला. या माहितीमध्ये किती सत्यता होती हेदेखील पडताळून पाहण्याचे कष्ट या लोकांनी घेतले नाहीत. या लोकांचा प्रचंड राग आला असून त्यांची घृणा वाटायला लागली आहे. सत्यता न जाणता असं कृत्य करणारेच खरे दोषी असतात”, असं ट्विट अजयने केलं आहे.

दरम्यान, अजयने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी याप्रकरणी संताप केला आहे. तसंच अजयच्या मताशी सहमत असल्याचंही नेटकऱ्याचं म्हणणं आहे. सध्या करोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत. मात्र तरीदेखील काही जण त्यांच्यावर हल्ला करत आहेत. विशेष म्हणजे यापुढे कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकांवर हल्ला केला किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केलं तर त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.