बॉलिवूडमधले आघाडीचे निर्माते आणि अभिनेत्यांनी नुकतीच मुंबईत आलेल्या पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत चित्रपटसृष्टीतील अनेक समस्या, आव्हानं आणि भविष्याबद्दल चर्चा झाली.

अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगन, प्रसून जोशी, सिद्धार्थ रॉय कपूर, रोनी स्क्रूवालासह अनेक निर्माते, अभिनेते यांची मंगळवारी मोदींसोबत भेट झाली. या भेटीत चित्रपटसृष्टीतील अनेक समस्या निर्मात्यांनी पंतप्रधान मोदींपुढे मांडल्या. त्याचप्रमाणे या क्षेत्राच्या विकासाबद्दलही मोदींशी चर्चा झाली. अभिनेता अक्षय कुमारनं या भेटीचा फोटो ट्विट करत ही चर्चा खूपच सकारात्मक झाली अशी माहिती दिली. तसेच समस्यांपासून तोडगा काढण्याचं आश्वासनही मोदींनी दिल्याचं अक्षयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेक समस्या सोडवण्यासाठी शक्य तितक्या लवकर विशेष समितीची स्थापना केली जाईल असं आश्वासन मोदींनी या बैठकीत चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या मंडळाला दिलं असल्याचं समजत आहे. चित्रपटांवर लावण्यात येणारा कर आणि इतरही गोष्टींवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

या भेटीत मोदींनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं कौतुकदेखील केलं. भारतीय चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादीत न राहता जगभरातील प्रेक्षकवर्गाला आकर्षित करत आहेत. अनेक परदेशी प्रेक्षकही या चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहेत ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे असंही मोदी या भेटीत म्हणाले. यापूर्वी २४ ऑक्टोबरला मोदींनी दिल्लीत चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधींची भेट घेतली होती.