News Flash

बॉलिवूडचा खिलाडी या चित्रपटासाठी घेणार आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन

खेळाडूच्या जीवनावर आधारित चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मागील वर्षात एअरलिफ्ट आणि रुस्तम यासारखे दमदार चित्रपट दिल्यानंतरही त्याचे फिल्मफेअर पुरस्कारामध्ये वर्णी लागली नव्हती. फिल्मफेअरच्या शर्यतीतून अक्की अर्थात अक्षय कुमार पात्र ठरला नसला तरी आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, आगामी चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गोल्ड’ नावाच्या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या भूमिकेमुळे त्याची चांदी होणार असल्याचेही समजते. अक्षयने या चित्रपटासाठी बॉलिवूड कारकिर्दीतील सर्वाधिक मानधन घेतल्याची चर्चा सुरु आहे.

‘गोल्ड’ हा चित्रपट भारतीय हॉकीपटू बलबीर सिंगच्या जीवनावर आधारित आहे. बलबीरने १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदकाची कमाई केली होती. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये बलबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करणार असून ‘गोल्ड’ हा चित्रपट फरहान अख्तर यांच्या होम प्रोडक्शनच्या साथीने तयार करण्यात येणार आहे. सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपये मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात मिल्खा सिंगच्या भूमिकेत दिसलेल्या फरहानला अक्षयसोबत सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र फरहानने ही भूमिका नाकारल्याचे समजते. फरहानने भूमिका करण्यास नकार दिल्यानंतर या चित्रपटातील दुय्यम दर्जाच्या भूमिकेसाठी साकिबला करारबद्ध केल्याचे समजते. साकिबने यापूर्वी जॉन अब्राहम आणि वरुण धवनच्या ‘ढिशूम’ या चित्रपटात काम केले आहे.

अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी २’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट ‘जॉली एलएलबी’ चा सिक्वल असून १० फेब्रुवारी २०१७ ला या चित्रपटातून अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ४२ कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. अर्थातच आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटासाठी अक्षयला ५० कोटीचे मानधन हे सर्वोच्च ठरणार आहे. बॉलिवूडमध्ये यापूर्वी अनेक खेळाडूंच्या जीवनावार आधारित चित्रपट पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दिन, मिल्खा सिंग, मेरी कोम यांच्या जीवनपटाला भारतीय चित्रपट चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 10:34 pm

Web Title: akshay kumar charge highest fees for upcomig movie gold
Next Stories
1 VIDEO: शाहिदने केली मीराची नक्कल
2 …म्हणून यामीला ह्रतिक ‘काबिल’ वाटतो
3 सिद्धार्थने पुन्हा एकदा दाखवून दिले आलिया प्रेम
Just Now!
X