करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व शूटिंग रद्द करण्यात आले. जवळपास तीन महिने सर्व शूटिंग बंद केल्यानंतर आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहेत. त्यातच अनेक चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र या वर्षी दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समजतंय. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ’83’ हे दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं तरण आदर्शने सांगितलं. त्यानंतर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ’83’ हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होते. मात्र लॉकडाउनमुळे सर्वच थिएटर बंद झाले. त्यामुळे चित्रपटांचं प्रदर्शनही पुढे ढकललं गेलं.

अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ओटीटीवर प्रदर्शित होणारे इतरही अनेक चित्रपट आहेत. सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’, अजय देवगणचा ‘भुज’, आलिया भट्टचा ‘सडक २’, अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार आहे.