मराठी भाषा, संस्कृती ही संत ज्ञानदेव, नामदेवांपासून ते शिवाजी महाराज, टिळक, सावरकर, फुले, आंबेडकर इतक्या मोठमोठय़ा कर्तबगार व्यक्तींनी वाढवली. या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र बनला आहे, मराठी घडली आहे आणि हे सत्य नाकारणारे आपल्याइतके संकुचित कुणी असूच शकत नाही, अशी स्पष्ट टीका अभिनेता सुबोध भावे यांनी केली.

‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादातून विविध विषयांवर परखडपणे मते व्यक्त करणाऱ्या सुबोध यांनी आपली भाषा, आपली माणसे आपणच मोठी केली पाहिजेत, हे आग्रही मत मांडले.

पुण्यात सदाशिव पेठेतील नाटकाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य तरूण ते ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘बालगंधर्व’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सारखे उत्तम चित्रपट देणारा अभिनेता असा सुबोध यांचा आजवरचा प्रवास ‘सहज बोलता बोलता’ या शुक्रवारी रंगलेल्या वेबसंवादातून उलगडला. कलाकार म्हणून ही जडणघडण होत असताना भाषेपासून ते बालनाटकांपर्यंत अनेक विषयांवर ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी चिन्मय पाटणकर यांनी सुबोध यांना बोलते केले. मराठी भाषा स्वच्छ, सुंदर बोलली गेली पाहिजे, याबद्दल वेळोवेळी सुबोध यांनी भूमिका घेतली आहे. एक कलाकार म्हणून मालिका-चित्रपटांतून ज्या पध्दतीची मराठी भाषा बोलली जाते त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्नही होतो का, यावर त्यांनी जोरदार टीका केली.  सुबोध यांनी अदूर गोपालकृष्णन दिग्दर्शित मल्याळम चित्रपटातून काम केले आहे, त्यांनी बंगाली चित्रपटातही काम केले आहे. या दोन्ही भाषेतून काम करत असताना तेथील लोक आपल्या भाषेवर मनापासून प्रेम करतात. ते मातृभाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेत बोलत नाहीत, हे प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगितले.

कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनयाच्या क्षेत्रात केलेला प्रवास, यशापयशाच्या भ्रामक कल्पनांमध्ये न अडकता सातत्याने स्वत:त सुधारणा करत राहण्याची प्रक्रिया, आत्मविश्वास आणि अभ्यासाच्या जोरावर साकारलेल्या भूमिका हा सगळा प्रवास त्यांनी मनमोकळेपणाने गप्पांमधून उलगडला. कोणत्याही क्षेत्रात उतरलात तरी कठोर मेहनत, अभ्यास, वाचन आणि कलेचा व्यासंग याला पर्याय नाही, हेही त्याने नमूद केले.

मालिका-चित्रपट हा समाजाचा आरसा आहे आणि मुळातच आपल्याकडे मराठी खूप वाईट पध्दतीने बोलली जाते. मराठी माणसाला भाषेचा पर्याय दिला तर तो मराठी सोडून हिंदी किं वा इंग्रजी भाषेचा सहज स्वीकार करतो. देशभरात अशापध्दतीने आपल्या भाषेचा अपमान इतर कु ठल्याही राज्यातील नागरिकांकडून केला जात नाही.  एखादी वस्तू वापरलीच नाही तर ती निरूपयोगी ठरत जाते, त्याचप्रमाणे भाषाही वापरली नाही तर तिला गंज चढतो, तिला अनेक पर्याय उभे राहतात आणि मूळ भाषा लयाला जाते.

– सुबोध भावे.