लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘तांडव’ वेब मालिके तील एका दृश्यात हिंदू देवतांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडल्याने उद्भवलेल्या वादावर अ‍ॅमेझॉन प्राईमने दिलगिरी व्यक्त केली आहे.

जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेली अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ या वेब मालिके तील एका दृश्यात हिंदू देवदेवतांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडल्याने देशभरातून याला विरोध झाला होता. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याने ही वेब मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही याला आक्षेप नोंदवला होता. याआधी दिग्दर्शकानेही याप्रकरणी दिलगिरी व्यक्त के ली होती. आता अ‍ॅमेझॉन प्राईमनेही एका पत्रकाद्वारे माफी मागितली आहे.

‘नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तांडव वेब मालिके तील काही दृश्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटल्यास आम्ही माफी मागतो. यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून वेब मालिके तील आक्षेपार्ह दृश्य वगळून ती पुन्हा प्रदर्शित के ली आहेत. प्रेक्षकांच्या श्रद्धा आणि भावनांचा आम्ही आदर करतो. भारतीय न्याय व्यवस्थेचा आम्ही आदर करत असून यापुढे कायद्याचे पालन करू’ , असे ट्वीट करत माफी मागितली आहे.