अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आणि नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिने पदार्पणातच प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. पाटर्य़ामध्ये रमणारी, भटकंतीची आवड असणारी, संगीतवेडी आणि वाचनही भरभरून करणाऱ्या अनन्याचा ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ हा पहिलावहिला चित्रपट. त्यानिमित्ताने..

लहानपणीच चित्रपट-अभिनय क्षेत्रात यायचं हे मनाशी ठरवलं होतं. लहान असताना मी, सुहाना (शाहरुख खानची मुलगी), शनाया आम्ही ‘अ‍ॅक्टिंग अ‍ॅक्टिंग’ खेळायचो. सुहाना आणि शनाया सोडून चित्रसृष्टीत माझे अन्य कोणी मित्र-मैत्रिणी नाहीत. वडिलांबरोबरही कधीच चित्रपटाच्या सेटवर गेले नाही. त्यामुळे तेव्हा वडिलांबरोबर काम करत असलेले कलाकार आणि आता चित्रपटसृष्टीत असलेले कलाकार यांना प्रत्यक्ष भेटते तेव्हा आजही मी सर्वसामान्यांसारखीच प्रभावित होते. मी या सगळ्यांचीच चाहती आहे. त्यांच्यासमोर मला बुजल्यासारखं होतं. बोलायला शब्दही सापडत नाहीत, असे अनन्याने सांगितलं.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’च्या माध्यमातून वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अलिया भट्ट असे तीन नवोदित कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला दिले. आता त्या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये मी आणि तारा सुतारिया अशा दोघी जणी प्रेक्षकांसमोर येणार आहोत. लहानपणापासून करण मला ओळखत होते. कारण ते माझ्या आईचे खूप चांगले मित्र आहेत. मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे मी ऑडिशन द्यायला गेले तेव्हा त्यांना सुरुवातीला आश्चर्य वाटल्याच अनन्यानं एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

वडिलांनी मला अभिनय किंवा इतर काही शिकवायचं म्हणून काहीच शिकवलं नाही. त्यांच्या वागणुकीतून मी शिकत गेले. माझ्या जन्माआधी ते हिंदी चित्रपटसृष्टीत खूप व्यग्र होते. लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. पुढे काही काळ त्यांनी विश्रांती घेतली. त्यामुळे लोकप्रिय असणं आणि लोकप्रियतेपासून दूर राहणं अशा अभिनय क्षेत्रातील त्यांच्या दोन्ही बाजू मी पाहिल्या. दोन्ही प्रकारच्या परिस्थितीत ते व्यक्ती आणि माणूस म्हणून कधीच बदलले नाहीत, असं अनन्या म्हणाली.

किंग खान अर्थातच शाहरुख खानचा माझ्यावर जास्त प्रभाव असून ते सुपरस्टार असले तरी माझ्यासाठी ते सगळ्यात आधी माझी मैत्रीण सुहानाचे बाबा आहेत. सुहानाचे बाबा म्हणूनच त्यांच्याशी आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे शाहरुख खान या व्यक्तीशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आपल्या लोकप्रियतेपेक्षा अभिनयातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत राहा, असा सल्ला शाहरुख खान यांनी दिल्याचं अनन्यानं सांगितलं.

सुहाना, शनाया आणि अनन्या यांचा समाजमाध्यमावर ‘चार्लीज एंजल्स’ नावाचा ग्रुप आहे, त्यावर या तिघींच्या नेहमी गप्पाटप्पा सुरू असतात. याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटात काम करतेय, हे त्या दोघींना सांगितलं नव्हतं. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्या दोघींनी तो ट्रेलर ग्रुपवर शेअर केला आणि मला शुभेच्छा दिल्या. आम्हा तिघीनाही ‘चार्लीज एंजल्स’ हा चित्रपट खूप आवडतो. आम्ही तिघींनी तो एकत्र पाहिला होता त्यामुळे त्याच नावाने ग्रुप केला. त्यावर आमच्या गप्पा सुरू असतात. माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर मी खूप बडबड करते, पण इतरांमध्ये मिसळायला लाजते. माझ्यातली हा लाजाळूपणा घालविण्यासाठी दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने बरीच मेहनत घेतल्याचे अनन्या म्हणाली. सारा, जान्हवी आणि तुझ्याविषयीही चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. तुमच्यात स्पर्धा आहे की मैत्री? यावर अनन्या म्हणते, मला स्वत:ला स्पर्धा आवडते. सारा आणि जान्हवी माझ्या मैत्रिणीच असून दोघीही चांगलं काम करत आहेत. त्यामुळे मलाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.

करण जोहर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला तसंच संजय लीला भन्साळी, झोया अख्तर, वरुण धवन, रणवीर सिंग यांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. कार्तिक आर्यनबरोबर काम करण्याची इच्छा ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटामुळे पूर्ण झाली. अभिनेता टायगर श्रॉफ हा माझ्या पहिल्या चित्रपटाचा नायक आहे. टायगर हा अ‍ॅक्शन तर कार्तिक विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. खरं तर दोघांनीही आपापल्या भूमिकांची अदलाबदल करायला हवी. टायगरने विनोदी आणि कार्तिकने अ‍ॅक्शन भूमिका करायला पाहिजे, असंही अनन्या म्हणाली.

घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. मला स्वत:ला मेहनत करू नच या क्षेत्रात ओळख निर्माण करायची आहे. आत्ताच्या कलाकारांनी आपल्या भूमिकांची चौकट आखून न घेता सातत्याने प्रयोग करत राहिले पाहिजे.      अनन्या पांडे</strong>