आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१८ मधल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला. गेल्याच आठवड्यात तो ‘पिआनो प्लेअर’ या नावानं चीनमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात तुफान कमाई चीनच्या बॉक्स ऑफिसवर केली आहे. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

पहिल्या पाच दिवसात ‘अंधाधून’नं  ९५. ३८ कोटींची कमाई केली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतात पहिल्या आठवड्यात २७.६५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात कमाईत घट झालेली पाहायला मिळाली. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं १४.२५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती. मात्र चीनमध्ये हिच कमाई दुप्पट झाल्याची पहायला मिळली.

‘अंधाधून’ हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू सारखी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. भारतीय प्रेक्षकांची खूप चांगली पसंती या चित्रपटाला लाभली. त्यानंतर वर्षभरानं हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय व्हायकॉम १८ स्टुडिओनं घेतला. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.

आतापर्यंत आमिर खानच्या चित्रपटांना चीनमध्ये सर्वाधिक पसंती होती. मात्र आता इतरही भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात बजरंगी भाईजान, हिंदी मीडिअम यांसारखे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले या चित्रपटांनी चांगली कमाई चीनमध्ये केली.