बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक भूमिका केल्या पण एखाद्या विशेष भूमिकेमुळे ते लोकप्रिय झाले आणि त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. अर्शद वारसीच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. त्यानेही अनेक चित्रपट केले मात्र तो ओळखला जातो ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातल्या त्याच्या सर्किटच्या भूमिकेमुळे. ही भूमिका खरंतर सहाय्यक भूमिका होती पण ती तुफान गाजली आणि लोकप्रिय झाली. आज अर्शदचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

अर्शदच्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याला फार संघर्ष करावा लागला. दहावीतच त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. वडिलांच्या निधनानंतर आपला बंगला सोडून त्याच्या परिवाराला एका खोलीच्या घरात जावं लागलं. अर्शदने घर चालवण्यासाठी खूप काही केलं. कधी त्याने फोटोग्राफरकडे काम केलं तर कधी सेल्समन होऊन कॉस्मेटिक्स विकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

यानंतर त्याने चित्रपटाकडे वळायचं ठरवलं. महेश भट्टसोबत त्याने ‘काश’ आणि ‘ठिकाना’ या चित्रपटांसाठी असिस्टंट म्हणून काम केलं. पण मिळालेले सगळे पैसे आईच्या उपचारासाठी खर्च होत होते.

हळूहळू त्याने सहाय्यक भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यातून त्याला ओळख प्राप्त होऊ लागली. त्याने ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘होगी प्यार की जीत’, ‘जितेंगे हम’, ‘जानी दुश्मन’ अशा चित्रपटात काम केलं. पण २००३ साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने त्याचं आयुष्यच बदलून गेलं. या चित्रपटात त्याने साकारलेली सर्किटची भूमिका प्रचंड गाजली आणि लोकप्रियही झाली.

त्याने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हलचल’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘चॉकलेट’, ‘सलाम नमस्ते’, ‘जॉली एलएलबी’, ‘डेढ इश्किया’, ‘वेलकम टू कराची’, ‘धमाल’, ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. गेल्या वर्षी त्याचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट आला होता. तसंच त्याची भूमिका असलेली ‘असूर’ ही वेबसीरीज चांगलीच गाजली. लवकरच तो अभिनेता अक्षय कुमारसोबत त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे.