सुहास जोशी

चित्रपट म्हणजे काय तर एन्टरटेन्मेन्ट, एन्टरटेन्मेन्ट आणि एन्टरटेन्मेन्ट असं डर्टी पिक्चरमधील विद्या बालन पडद्यावर ऐकवते, तसेच आता हिंदी (की हिंग्लिश?) वेबसीरिज म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप आणि रिलेशनशिप असं म्हणावं लागेल. गेल्या महिन्याभरातील काही वेबसीरिज पाहिल्यास हेच दिसून येते. अनमॅरीड, रेडी टू मिंगल आणि बोम्बाई या तीनही वेबसीरिज केवळ आणि केवळ रिलेशनशिपवरच बेतल्या आहेत. यातील बोम्बाईचे सध्या केवळ तीनच भाग प्रदर्शित झाले असले आणि त्यात काही तरी वेगळा प्लान असल्याचे (असं संवादात येतंय म्हणून) वाटत असलं तरी तिचं वळणदेखील रिलेशनशिपच्याच वाटेने जाणार असे दिसतंय.

असो, पण एकूणच आपल्याकडे रिलेशनशिप हा सध्या परवलीचा शब्द झाल्याप्रमाणे जेथे पाहावे तेथे चर्चिला जातोय. त्यामुळे वेबवरदेखील हेच दाखवले तर दर्शक पाहतील असे वाटणे साहजिकच आहे. पण त्यातदेखील अगदी मूलभूत गोष्टींचा आगापिछा नसणारे अनेक प्रयोग पाहण्यापेक्षा या तीन वेबसीरिज तुलनेने खूपच बऱ्या म्हणाव्या लागतील. हिंदी चित्रपटात कसा अधूनमधून प्रेमकथांचा पूर येतो तसंच हे प्रकरण. फक्त हल्ली अमुक एक एखादीच्या प्रेमात आहे असं म्हणत नाहीत, तर ते रिलेशनशिपमध्ये आहेत असं म्हणतात. पण त्यात असंख्य प्रकार असतात. म्हणजे ओपन रिलेशनशिप, कमिटेड रिलेशनशिप वगैरे वगैरे. हे सारं या तीनही वेबसीरिजमध्ये पाहायला मिळते.

अनमॅरीड आणि रेडी टू मिंगल या थेटच रिलेशनशिपबद्दल बोलतात हे त्यांच्या नावावरूनच दिसते. के, साहील, अबी आणि चिराग या चौघांच्या रिलेशनशिपवर अनमॅरीड बेतली आहे. के आणि साहीलचं स्टार्टअप आहे, अबी यूपीएससीच्या विद्यर्थ्यांना शिकवतोय आणि चिराग लग्नासाठी मुली पाहतोय. साहीलचं केवर प्रेम आहे, अबीची रिलेशनशिप खतरे मे आहे, आणि चिरागला स्वप्नातदेखील पाहिले नाही असे वातावरण आहे. पण केला लग्नच करायचं नाही, अबी जुनी मैत्रीण भेटल्याने गोंधळलाय, चिराग स्वप्नांच्या पलिकडे गेलाय. पण प्रत्येकाला लग्न करायचं, के  सोडली तर.

रेडी टू मिंगल वेगळ्याच वाटेवरचं प्रकरण आहे. आपापल्या डेटमध्ये वैतागून पळून आलेले नीरव आणि मार्या एकमेकांना भेटतात आणि रिलेशनशिपमध्ये अडकतात. विशेष म्हणजे दोघे एकत्र राहायला लागतात आणि चक्क सिंगल लोकांना मिंगल करण्यासाठी एका पार्टी मॉडेलचं स्टार्टअप सुरू करतात. वेगळ्या प्रकारचे विवाहमंडळच. पण त्या सगळ्या गोंधळात त्यांची रिलेशनशिप अडचणीत आलेली आहे. पण धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी यांची स्थिती झाली आहे. तर बोम्बाईमध्ये काहीतरी वेगळीच योजना आहे. रिलेशनशिपमधील दोन जोडपी एकाच इमारतीत भाडय़ाने राहायला जातात. एका फ्लॅटमध्ये केवळ मुलं आणि दुसऱ्यात केवळ मुली. पण ते केवळ घरमालकाच्या डोळ्यात धूळ  फेकण्यासाठी. त्यातून त्यांना नेमकं काय करायचंय याचं चित्र अजूनतरी स्पष्ट झालेले नाही.

काही प्रमाणात वास्तवाच्या जवळ जाणारं तर काही वेळा अगदीच नाटकीय अशी ही कथानकं आहेत. वास्तवाच्या जवळ जाणारी असं म्हणण्याचं कारण म्हणजे यातील भाषा, वावरणे, एकूणच जगण्याबद्दलच्या कल्पना हे सारे बऱ्यापैकी जुळणारं आहे. मुख्यत: यातील भाषा ही पूर्णपणे हिंग्लिश आहे. अनेकदा आपण इंग्रजी वेबसीरिज पाहतोय असेच वाटते. पण हेच आजच्या काळातील वास्तवदेखील आहे. ही सर्वच पात्रं इतर शहरातून मुंबई आणि दिल्लीत राहायला आलेली असली तरी त्यातून तरुणाईचं प्रतिबिंब दिसते. अनमॅरीडमध्ये ते अधिक दिसते, तुलनेने इतर ठिकाणी ठरावीक वर्गाशीच निगडित आहे.

या सर्वच सीरिजच्या बाबतीत एक चांगली बाब आहे ती म्हणजे या सर्वाची निर्मिती गुणवत्ता चांगली आहे. हल्ली बऱ्याच वेबसीरिज निर्मितीबाबतीत अगदीच टुकार असतात, तुलनेने या खूपच बऱ्या आहेत, त्यामुळे त्या पाहण्यालायक झाल्या आहेत. बाकी कथेत फार काही थोर, क्रांतिकारी नसले तरी जे आहे ते पाहताना उगाच काही घुसडलंय असं वाटत नाही. त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे हल्ली वेबसीरिज म्हणजे सेक्स आणि शिव्यांचा मुक्त वापर अशी एक व्याख्या तयार होत असली तरी यामध्ये या दोहोंचा अतिशय संयतपणे वापर करण्यात आला आहे. आणि कथेला तो पूरक असाच आहे.

बरेच बरे मुद्दे असले तरी काही ठिकाणी टिपिकल हिंदी चित्रपटाप्रमाणे कथानकात काही भाग घुसवण्याचे प्रकारदेखील येथे होतात. पात्रांची नेमकी पूर्वपीठिका न कळता काही पात्र कथेत वावरायला लागतात. आर्थिक बाजूवर बोलणाऱ्या पात्रांचे राहणीमान मात्र त्याला अनुरूप नसते. अशा काही घटना यातदेखील आहेत. पण तसे असले तरी एकूणच हे सारं प्रकरण पाहायला फारसे त्रासदायक नाही. फक्त अनमॅरिडमध्ये प्रत्येक भागानंतर दुसऱ्याच दोन मुली स्क्रीनवर बडबड करत त्या भागाची लाडीक चिकित्सा करतात ते अगदीच बालीश आहे. या तीनही सीरिजचे अजून सीझनदेखील येतीलच, पण सध्या तरी त्या बऱ्या वाटतात असे म्हणता येईल.