News Flash

लुकलूकत्या गोष्टी : ‘हा ड्रेस मला खूप आवडला’

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियांकाने जो ड्रेस परिधान केला होता, त्यावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली

(संग्रहित छायाचित्र)

प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून नावारूपाला आल्यापासून तिच्या प्रत्येक गोष्टीची सतत चर्चा होते आहे. त्यातही तिच्या फॅशनविषयी सातत्याने बोललं जातं. पण देशभरातूनच नाही तर जगभरातून होणाऱ्या टीकेला बाजूला सारत आपल्याला जे करायचं आहे तेच ती ठामपणाने करत आली आहे. घाबरणारी ती मी नव्हेच, या स्टाइलने वावरणारी प्रियांका म्हणूनच सगळ्यांना पुरून उरते. याची प्रचीती पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांनी आणि टीकाकारांनीही ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घेतली आहे.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियांकाने जो ड्रेस परिधान केला होता, त्यावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली. प्रियांकाचा ड्रेस हा एक प्रकारे ‘वॉर्डरोब मालफंक्शन’च होतं असंही म्हटलं गेलं. प्रियांका मात्र आपण निवडलेल्या ड्रेसमध्ये टेचात वावरली आणि तिने तिच्या चाहत्यांसह टीकाकारांनाही तितक्याच प्रेमाने ही गोष्ट समजावून सांगितली आहे.

राफ आणि रुसो डिझायनर जोडीचा ड्रेस तिने परिधान केला होता. खरे तर या पुरस्कार सोहळ्याला प्रियांका पती निक आणि त्याचे दोन्ही भाऊ आणि जाऊबाईंसोबत हजर झाली होती. मात्र त्या दोघींपेक्षाही प्रियांकाचा ड्रेस हा अधिक अंगप्रदर्शन करणारा होता, अशी टीका केली गेली. इतकंच नाही तर हा ड्रेस नीट फिट नव्हता, अशीही टीका केली गेली. प्रियांकाने यातली कुठलीही गोष्ट खरी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी नेहमीच या डिझायनर जोडीच्या ड्रेसला पसंती देते. आणि त्यांनी माझ्यासाठी तयार केलेला हा पांढरा ड्रेस मला खूप आवडला. दरवेळी माझ्यासाठी ड्रेस बनवताना तो मला फिट असेल, दिसेल याची ते नेहमीच काळजी घेतात. वॉर्डरोब मालफंक्शन होऊ नये, यासाठी त्यांनी खास काळजी घेतलेली असते, तशा दृष्टीने आधीच उपाय केलेले असतात. मी जो ड्रेस परिधान केला होता, त्यातही ती काळजी घेण्यात आली होती. त्यासाठी ड्रेसच्या आतून विशिष्ट पद्धतीने माझ्या वर्णानुरूप रंगाच्या जाळीदार फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. अर्थात हे लोकांना दिसणं अशक्य आहे. त्यामुळे बाकीच्यांना त्याची कल्पना आली नाही, मात्र मला हे सगळं माहिती होतं, असं तिने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर आपली ड्रेसची निवड चुकली असंही तिला वाटलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं. कुठलाही ड्रेस परिधान करण्यापूर्वी तो व्यवस्थित फिट आहे ना, त्या बाबतीतली खबरदारी घेतली आहे ना, हे सगळं नीट निरखून पाहिल्यावरच मी त्याची निवड करते. त्यामुळे एकदा ड्रेस अंगावर चढवून बाहेर पडले की कुठलंच दडपण, भीती माझ्या मनात नसते. सुरक्षेची सगळी काळजी आपण आधीच घेतली आहे हे मनाशी ठाम असल्यावर वॉर्डरोब मालफंक्शनची भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. कोणालाही आपल्या बाबतीत वॉर्डरोब मालफंक्शन झालेलं आवडत नाही, मला तर अजिबात आवडत नाही, असंही प्रियांकाने स्पष्ट केलं.  एकंदरीतच कोणावरही न चिडता, ओरडता देसी गर्लने व्यवस्थितपणे आपली बाजू चाहत्यांसमोर मांडत सगळं प्रकरण सावरलं आहे. तिची हीच हुशारी सातत्याने कौतुकाचा विषय ठरते आहे. फॅशनच्या बाबतीत धोका न पत्करणारी प्रियांका कामाच्या बाबतीतही तितकीच चोख आहे. नेटफ्लिक्सचा ‘वुई कॅ न बी हिरोज’, अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर आधारित चित्रपटात ती काम करते आहेच. त्यात आणखी एका महत्त्वाच्या चित्रपटात तिने आपली जागा कायम केली आहे. कीनू रीव्हजच्या ‘मॅट्रिक्स ४’मध्येही प्रियांका दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला नाही तरच नवल!

फ्युरिअस आणि सलमान..

देसी कलाकार आणि विदेशी चित्रपट अशी जोडी जुळून आली की सहजच आपल्या भुवया उंचावतात. त्यातही सलमान खानचं नाव जोडलं गेलं तर काय होईल? मात्र सलमानच्या बाबतीत तो हॉलीवूडपट करतो आहे अशी काही बातमी अद्याप तरी आलेली नाही. आणि तरीही त्याची चर्चा होते आहे तीही ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ या गाजलेल्या चित्रपट मालिकेतील नव्या चित्रपटामुळे.. व्हिन डिझेल, मायकेल रॉड्रिग्ज यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ९ : द फास्ट सागा’ हा चित्रपट येत्या २२ मेला प्रदर्शित होतो आहे. बरं तो फक्त इंग्रजीत नाही तर नेहमीप्रमाणे हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेतही डब होऊन प्रदर्शित करण्यात येणार आहे. आता यात सलमान खानचा संबंध येतोच कुठे? तर इथे फक्त आणि फक्त सलमान खानचाच संबंध आहे, कारण व्हिनचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. आणि या तारखेला भाई सलमानचा ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे काँटे की टक्कर तिकीटबारीवर दिसणार आहे. मुळात, या ईदच्या मुहूर्तावर कोणता चित्रपट प्रदर्शित करायचा, या विचारानेच भाईची दमछाक झाली होती. त्यात खूप सारे प्रयत्न करून अखेर प्रभुदेवाच्या मदतीने ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वल म्हणून ‘राधे’चा घाट घालण्यात आला. आता हा चित्रपट ईदला प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर त्याला कुठलीच काळजी नव्हती, पण आता व्हिन फास्ट फास्ट येऊन मध्ये कडमडला आहे. आता ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ हा इंग्रजी चित्रपट आहे, त्यामुळे सलमानच्या चित्रपटाशी तो काय टक्कर देणार? दोन्हींचा प्रेक्षकवर्ग वेगळा.. असं जर काही तुमच्या मनात असेल तर भूतकाळात डोकवावं लागेल. आतापर्यंत ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ चित्रपट जेव्हा जेव्हा भारतात प्रदर्शित झाला आहे तेव्हा तेव्हा तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्या तुलनेत सलमानच्या चित्रपटांच्या कमाईचा आकडा घसरत चालला आहे. त्यामुळे या ईदला ‘राधे’ वरचढ ठरतो आहे की फास्टमुळे फ्युरिअस होतो आहे हे कळेलच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:44 am

Web Title: article on priyanka wore a dress on the red carpet at the grammy awards ceremony abn 97
Next Stories
1 ‘द मिरर क्रॅक्ड’ नाटकाच्या निमित्ताने..
2 कलासक्त चित्रपट‘हिज फादर व्हॉइस’चे जगभरात प्रक्षेपण
3 मेकअप अंतर्मनातील बदलाची प्रक्रिया
Just Now!
X