‘टारझन द वन्डर कार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आयेशा टाकीया बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ‘सूरक्षेत्र’ या टीव्हीवरील संगीत रियालिटी शोमध्ये शेवटची दिसलेल्या आयेशाने गेल्या आठवड्यात पुत्ररत्नाला जन्म दिला. तिच्या घरी आनंदाचे वातावरण असून, पती फरहान आझमीने टि्वटरवर लिहिलेल्या संदेशात देवाचे आभार मानत आनंद व्यक्त केला. आयेशानेदेखील टि्वटरवर प्रियजनांचे आभार मानून आपला आनंद व्यक्त केला. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, प्रियजनांकडून मिळालेले आशीर्वाद आणि शुभसंदेशांसाठी मी आणि माझा मुलगा सर्वांचे आभारी आहोत. सलमान खानबरोबर ‘वॉन्टेड’ चित्रपटात दिसलेल्या आयेशाने ‘डोर’ आणि ‘फूल एन फायनल’सारख्या चित्रपटांतदेखील काम केले होते.