एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २ द कनक्लुजन’ चीनमधील चित्रपटगृहांमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची चीनमधील प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, आता तेथे राहणाऱ्या चाहत्यांनी नक्कीच ती कॅलेंडवर मार्क करून ठेवायला हरकत नाही. व्यापार समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट येत्या १७ सप्टेंबरला चीनमध्ये प्रदर्शित होईल. जवळपास ४००० स्क्रिन्सवर प्रभासचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

वाचा : हॉलिवूडमध्ये ‘द रॉक’ला मागे टाकत प्रियांका बनली नंबर एकची सेलिब्रिटी

रमेश बाला यांनी ट्विट करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, यातील सर्व कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या शेजारील देशाला भेट देणार आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ‘बाहुबली द बिगनिंगला’ चीनमध्ये ६००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आले होते. आतापर्यंत सर्वाधिक स्क्रिन्स मिळालेला तेव्हा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. इतकेच नव्हे तर तेव्हा बाहुबलीच्या पहिल्या भागाने याबाबतीत आमिरच्या ‘पीके’लाही मागे टाकले होते. पण, नवा विक्रम रचूनही ‘बाहुबली द बिगनिंग’ चीनमध्ये भारताप्रमाणे आपली जादू कायम राखण्यात अयशस्वी ठरला होता. त्यामुळेच, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला यावेळी कमी स्क्रिन्स देण्यात आल्या आहेत. ‘बाहुबली २’ इतरही काही देशांमध्ये प्रदर्शित होणार असून यात जपान, कोरिया आणि तैवानचाही समावेश असल्याचे बाला यांनी ट्विट केलेय.

वाचा : सुनील ग्रोवरच्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’साठी कपिलच्या शोला डच्चू

दरम्यान, मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ने आधीच चीनी बॉक्स ऑफिसवर आपले नाव कोरले आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असून, प्रभास आणि राणा डग्गुबतीच्या चित्रपटापुढे आता मोठे आव्हान उभे राहिले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.