बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आले. एखाद्या घटनेबद्दल सामान्य प्रेक्षकांना असलेलं कुतूहल, न ऐकलेली बाजू पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. २००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर हा चित्रपट आधारलेला आहे.

कथा
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलीसच्या स्पेशल सेलचे अधिकारी के के (रवी किशन) आणि संजीव कुमार यादव (जॉन अब्राहम) आपल्या टीमसोबत बाटला हाऊस एल- १८ क्रमांकच्या इमारतीत घुसतात. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक होते. यात काही दहशतवादी मारले जातात. पण के के शहीत होतो. शिल्लक राहिलेल्या दहशतवाद्यांना मारण्यात आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात संजीव यांना यश येते. या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापतं. पोलिसांनी ज्यांना मारलं ते दहशतवादी नसून कॉलेजची मुलं होती असं काही राजकीय पक्ष व प्रसारमाध्यमांद्वारे पसरवलं जातं.

संजीव आणि त्याच्या टीमने बनावट एन्काऊंटर घडवून आणला असा आरोप होतो. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले जातात. हा एन्काऊंटर बनावट नव्हता हे संजीव आणि त्यांची टीम कशाप्रकारे सिद्ध करते, तसंच पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात त्यांना यश येतं का हे पुढे चित्रपटात पाहायला मिळतं.

रिव्ह्यू-
प्रत्येक घटनेचे विविध पैलू मांडत कथा पुढे नेणं हे दिग्दर्शक निखील आडवाणीच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य आहे. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण सर्व दृष्टीकोनातून प्रेक्षकांना दाखवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. यामध्ये पोलिसांचं धाडस, अपराधबोध, राजकारण, मानवाधिकार संघटनांचा आक्रोश, धार्मिक कट्टरता, प्रसारमाध्यम आणि तणाव या सर्व गोष्टींचा समावेश आहे. ‘एका दहशतवाद्याला मारण्यासाठी सरकार जी रक्कम देते, त्यापेक्षा जास्त एक ट्रॅफिक पोलीस आठवड्याभरात कमावू शकतो,’ यांसारखे चित्रपटातील संवाद टाळ्यांचा कडकडाट मिळवणारे आहेत. आपले प्राण धोक्यात घालून देशासाठी काम करणाऱ्या पोलिसांची बाजूही या चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात दिग्विजय सिंह, अरविंद केजरीवाल, अमर सिंह आणि एल. के. आडवाणी यांसारख्या नेत्यांचे रिअल फुटेज वापरण्यात आले आहेत. सौमिक मुखर्जीची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. चित्रपटाच्या शेवटी असलेला कोर्ट रुम ड्रामासुद्धा चांगला झाला आहे. जॉन आणि मृणाल ठाकूर दोघांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे.

स्टार-

साडेतीन स्टार