‘ट्विटर इंडिया’ने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बाजी मारली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या या यादीत ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या भारतीयांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत नमूद केल्याप्रमाणे, २०१७ या वर्षात ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले स्थान मिळाले असून, त्यांच्यामागोमाग बॉलिवूड कलाकारांची नावे असल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नव्या जोमाच्या कलाकारांमध्येही चिरतरुण बिग बीच खऱ्या अर्थाने महानायक ठरले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण, त्यांच्या ट्विटर अकाऊंटचे निरीक्षण केले असता त्यात फॉलोअर्सचा आकडा ३४ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. सध्याच्या घडीला त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा ३ कोटी १५ लाखांवर असून दरदिवशी हा आकडा वाढतच आहे.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

बिग बींमागोमाग या यादीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, दीपिका पदुकोण, सचिन तेंडुलकर, हृतिक रोशन आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. २०१७ या वर्षात शाहरुखच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा ४० टक्क्यांनी वाढला असून, सध्याच्या घडीला त्याच्या फॉलोअर्सचा आकडा ३ कोटी ९ लाखांवर पोहोचला आहे. त्याच्यामागोमाग सलमानचे नाव असून, त्याच्या फॉलोअर्सचा आकडाही ४० टक्क्यांनी वाढला आहे. पण, या आकड्यांमध्ये असणाऱ्या काहीशा फरकामुळे शाहरुखने त्याला मागे टाकले आहे हे खरे. या संपूर्ण यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एकटीच महिला असून, ती सातव्या स्थानावर आहे.