काळवीट शिकारप्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या सलमान खानच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. सलमानच्या जामिनाविरोधात बिष्णोई समाजाने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानला जामीन देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया बिष्णोई समाजाने दिली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याला जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला होता. ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्याला जामीन मिळाला. सलमान दोषी ठरल्याने आता न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच ७ मेरोजी त्याला व्यक्तिश: न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

सलमानच्या जामिनावर बिष्णोई समाज नाराज आहे. आम्ही सलमानच्या जामिनाविरोधात राजस्थान हायकोर्टात याचिका दाखल करु, असे बिश्णोई टायगर फोर्सचे राम निवास ढोरी यांनी सांगितले. ‘शिक्षा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच सलमानला जामीन मिळाला. हा निर्णय  दुर्दैवी आहे. आम्ही याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ आणि हायकोर्टात जाऊ’, असेही त्यांनी नमूद केले. सलमानसह अन्य आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयालाही हायकोर्टात आव्हान देऊ, असे बिश्णोई समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

१९९८ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरजवळील कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे दोन काळवीटांची शिकार करण्यात आली होती. यात सलमानसह तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान हे देखील आरोपी होते. मात्र, सलमानवगळता अन्य आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. तर सलमानला या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ९/५१ या कलमान्वये त्याला दोषी ठरवण्यात आले.