ब्रुनो मार्स याला मानाचे पाच पुरस्कार, केंड्रिक ला मार, एड शीरन चमकले

गेल्या काही वर्षांत टेलर स्विफ्ट, लेडी गागा, बियॉन्से आणि अडेल आदी दिग्गज गायिकांमुळे  झाडून साऱ्या ग्रॅमी पुरस्कारांवर महिला कलाकारांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शिरस्ता यंदा मोडला आहे. बऱ्याच वर्षांनंतर मानाच्या साऱ्या पुरस्कारांसह पुरुष कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारांवर बाजी मारली. उदयोन्मुख कलाकार म्हणून अ‍ॅलिसिया कारा हिला आणि सवरेत्कृष्ट लॅटिन अल्बम या गटासाठी शकिराला मिळालेल्या पुरस्काराव्यतिरिक्त सर्व महत्त्वाचे पुरस्कार ब्रुनो मार्स, केंड्रिक लामार आणि एड शीरन यांनी पटकावले.

संगीत जगतातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे झाला. यात आर अँड बी स्टार ब्रुनो मार्स याला २४ के मॅजिक अल्बमसाठी एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्याला ‘अल्बम ऑफ द इयर’ व ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ हे दोन्ही सन्मान प्राप्त झाले. त्याचा हा अल्बम ग्रॅमी पुरस्कारात चोवीस कॅरेट सोन्यासारखा चमकला. मार्स याने जे झेड ४-४४, लॉर्ड हिचा मेलोड्रामा, केंड्रिक लामारचा डॅम्न तर गॅम्बिनोचा अवेकन माय लव्ह यांना मागे टाकले.

मार्स याला एकूण सात प्रवर्गात नामांकन मिळाले होते; त्यात बेस्ट इंजिनीयर्ड अल्बम या गटाचाही समावेश होता. बत्तीस वर्षांचा ब्रुनो मार्स याने वर्षांतील उत्कृष्ट गाणे, आर अ‍ॅण्ड बी उत्कृष्ट कामगिरी, हे पुरस्कार दॅटस् व्हॉट आय लाइक व २४ के मॅजिकसाठी पटकावले. त्याला उत्कृष्ट आर अ‍ॅण्ड बी अल्बम पुरस्कारही मिळाला. वर्षांतील उत्कृष्ट गाण्यासाठी लुईस फॉन्सी व डॅडी यांकी, ज्युलिया मायकेल्स, अ‍ॅलिसिया कारा व खालिद यांचीही नामांकने होती. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारात केंड्रिक लमार हा दुसरा मोठा विजेता ठरला, त्याला एलपी डॅम्न साठी बेस्ट रॅप अल्बम तर हंबल या गीतासाठी बेस्ट रॅप साँग, बेस्ट रॅप कामगिरी, उत्कृष्ट संगीत चित्रफीत हे पुरस्कार मिळाले. जेम्स कॉर्डन याने या पुरस्कारांचे सूत्रसंचालन केले.

 महिलांची पीछेहाट

यंदाच्या पुरस्कारात लेडी गागा, टेलर स्विफ्ट, केशा  यांच्यासह अनेक महिला कलाकारांवर अन्याय झाला. ८६ पैकी केवळ सतरा पुरस्कार महिलांना मिळाले. शकिराच्या अल डोराडो या अल्बमला सवरेत्कृष्ट लॅटिन अल्बम म्हणून पुरस्कार मिळाला, तर अ‍ॅलिसिया कारा हिला उदयोन्मुख कलाकार म्हणून पारितोषिक मिळाले.

* अल्बम ऑफ द इयर- ब्रुनो मार्स- २४ के मॅजिक

* रेकॉर्ड ऑफ द इयर – ब्रुनो मार्स- २४ के मॅजिक

* साँग ऑफ द इयर- ब्रुनो मार्स-दॅटस व्हॉट आय लाइक

* बेस्ट न्यू आर्टिस्ट- अ‍ॅलिसिया कारा

* बेस्ट पॉप अल्बम- एड शिरन (डिव्हाइड)

* बेस्ट रॉक अल्बम- द वॉर ऑन ड्रग्ज (अ डीपर अंडरस्टँडिंग)

* बेस्ट आर अँड बी अल्बम- ब्रुनो मार्स- २४ के मॅजिक

* बेस्ट रॅप अल्बम- केंड्रिक लामार (डॅम्न)