भाऊ काल एक मुलगी बघितली रे, बस स्टॉप वर.. काय दिसत होती.., आपल्या शाळेतली ती मुलगी आठवते का रे तुला?.. अशा प्रकारची काही वाक्य मुलांच्या तोंडून सर्रास ऐकावयास मिळतात. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत किंवा नंतर करियर सुरु झाल्यावर का होईना पण एखादी तरी व्यक्ती आपल्याला आवडतेच. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीपर्यंत राहणार हे माहित नसतं. कधी कधी तर फक्त काही क्षणांसाठी आपल्या समोर आलेल्या व्यक्तीवर आपण भाळतो. पण अशी एखादी तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, हे मात्र खरं. आज आपण ज्या अभिनेत्याच्या क्रश बाबत जाणून घेणार आहोत त्याच्या आयुष्यात मात्र अशी कोणी व्यक्ती आलीच नाही. आपण बोलतोय ‘महाराष्ट्रचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्याविषयी.

‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ ही मालिका आणि ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘ढोल ताशे’, ‘मामाच्या गावाला जाऊया’ या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. सध्या टेलिव्हिजनवर गाजत असलेल्या ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आपल्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांवर पाडणा-या अभिजीतला त्याच्या क्रशविषयी विचारले असता ‘क्रश’.. ते काय असतं भाऊ? असचं काहीसं उत्तर मिळालं.

याविषयी बोलताना अभिजीत म्हणाला की, खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात असं काही झालं नाही. मला कोणत्याही नात्यात येण्याची भीती वाटायची. माझं कुणावर क्रश होतं असं मला आठवतही नाही. कॉलेजमध्ये असताना आमचा मुलामुलांचा एक ग्रुप होता. तेव्हा आम्हाला एक मुलगी आवडायची. जिला आम्ही नंतर कधी भेटलो नाही आणि तिला जाऊन कधीच काही विचारलंही नाही. पण, असं नेहमीच व्हायचं. एखादी छान मुलगी कॉलेजमध्ये आली की आम्हा सर्वांनाच ती आवडायला लागायची. पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत माझ्या आयुष्यात क्रश व्हावी अशी व्यक्ती आलीच नाही. त्या उलट, माझ्यावर अनेकांच क्रश झालं आणि अनेकींनी मला विचारलंसुद्धा. मात्र, मी या सगळ्याला घाबरायचो. बहुधा या विषयी माझ्या मनात असलेल्या भीतीमुळेच मी कधीच यात पडलो नाही.

असो, अभिजीतला भलेही तेव्हा कोणाशीचं क्रश झालं नसलं तरी एका व्यक्तिने मात्र त्याला क्लिन बोल्ड केले. अभिनेत्री सुखदा देशपांडे हिच्या प्रेमात पडलेल्या अभिजीतने तिच्याशी २०१३ साली विवाह केला.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com