गायत्री हसबनीस

‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आज २१ वर्षांनंतरही तितकाच लोकप्रिय ठरतो आहे, जेवढे इतर जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या सुरू आहेत. महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतातच, त्याचबरोबरीने या महोत्सवात हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींची फॅशन हाही चर्चेच विषय ठरतो, नव्हे अनेकदा जागतिक स्तरावरही ही फॅशन अनुसरण्याचा प्रयत्न केला जातो..

समाजमाध्यमांवर सेलिब्रिटींनी कुठलीही गोष्ट पोस्ट केली की लगेचच ती सेलिब्रिटी कुठे आहे व ती काय करते आहे, याचा पुरेपूर अंदाज येतो. समाजमाध्यमांमुळे प्रसिद्धीचं गणित महत्त्वाचं ठरतंय. त्यातून सेलिब्रिटींना घेऊन केली जाणारी प्रसिद्धी कलाकारांच्या दृष्टीनेच नव्हे तर कोणत्याही सोहळ्याच्या दृष्टीने खूप लाभदायीच ठरते. पण केवळ प्रसिद्धीला महत्त्व न देता सेलिब्रिटींची मतं, विचार, संवाद, चर्चा इत्यादींना महत्त्व देत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला महोत्सव म्हणून ‘मामि’चा उल्लेख करावा लागेल. वास्तविक या महोत्सवात सहभागी होणारे चित्रपटसृष्टीतील नामवंत, लोकप्रिय सेलिब्रिटी स्वत:लाही तितक्याच ग्लॅमरस शैलीत सादर करण्यासाठी धडपडतात. यंदा ‘मामि’ महोत्सवात हा प्रयत्न खासकरून जाणवला.

यंदा या महोत्सवाचे एकविसावे वर्ष होते. यात दोनशेपेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व अनेक पुरस्कारप्राप्त नामांकित चित्रपटांची पर्वणी होती. मात्र या मंचावर केवळ चित्रपट नाही, तर तिथे आलेल्या सेलिब्रिटींची फॅ शन, त्यांची स्टायलिंग या गोष्टी सहज नजरेत भरतील अशा पद्धतीच्या होत्या. मुळात या महोत्सवासाठी अनिता डोंगरे, रिबॉक, झारा आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे आउटफिट्स सेलिब्रिटींनी या वेळी परिधान केले होते, तरीही स्टायलिंगच्या बाबतीत सेलिब्रिटी खूप जागरूक होते. आलिया भट्ट, तापसी पन्नू, करीना कपूर, झोया अख्तर, नवाजुद्दीन सिद्दिकी, श्रिया पिळगावकर, भूमी पेडणेकर, सयामी खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनुराग कश्यप, सोना महापात्रा, कोंकणा सेन शर्मा, दीप्ती नवल, नसिरुद्दीन शाह, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, मृणाल ठाकूर,  सोभिता धूलिपाला, कुब्रा सईत, नुशरत भारूचा, रकुल प्रीत, करण जोहर आणि दीपिका पदुकोण यांसारख्या कलाकारांची मांदियाळी या महोत्सवात पाहायला मिळाली. या सर्व कलाकारांनी अगदी चपखल फॅशनकेली होती.

फॅशनचा विचार करतापुरुष आणि स्त्रियांसाठीच्या कपडय़ांमध्ये इतके पर्याय आता उपलब्ध आहेत की आपण आपल्या परीने खूप सर्जनशील स्टायलिंग करू शकतो. खरंतर आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आणि आपल्या सेलिब्रिटी प्रतिमेला न्याय देतील असे सुंदर आणि आकर्षक आउटफिट्स परिधान करून सेलिब्रिटींनी आपली मनं जिंकली नसतील तरच नवल. शबाना आझमी, कोंकणा सेन शर्मा आणि दीप्ती नवल यांनी साडीसारखा पारंपरिक पर्याय परिधान करून आपली एक वेगळी छाप पाडली. दीप्ती नवल या ‘रॉ मँगो’ या मोठय़ा आणि उत्तमोत्तम साडय़ा बनवण्यात पटाईत असलेल्या ब्रॅण्डच्या साडय़ा जास्त पसंत करतात. या वेळीही त्यांनी आकर्षक जरीची, सिल्क फॅब्रिक असणारी साडी नेसली होती. कोंकणा सेन शर्मा आणि शबाना आझमी यांची ओळख ही त्यांच्या पेहरावातूनही उमटते. या दोघी सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात आणि तशी छाप त्यांनी यंदाही पाडली. समाजमाध्यमांचा वापरही त्या कमी प्रमाणात करतात तरीही सहज त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. दीपिका पदुकोण वगळता कोणीच गाऊ नचा पर्याय वापरला नव्हता. सहज, आरामदायी असे कपडे बऱ्याचजणांनी वापरले होते. जान्हवी कपूरदेखील कॅज्युअल वेअरमध्ये दिसली. अर्थात, दीपिका पदुकोण आणि जान्हवी कपूर हिने ब्राइट पॅटर्न्‍स वापरले होते. दीपिका पदुकोणने निळ्या गाऊ नवर डार्क ब्लॅक पोलका डॉट्सचा फंडा आणि जान्हवीने शिमर स्कर्टवर केशरी स्टारच्या पॅटर्नचा पांढरा शर्ट घातला होता. मुळात अशा डिझाइनचे कपडे हे फिल्म फेस्टिव्हलमध्ये फार आकर्षित करतात. व्हेनिस चित्रपट महोत्सव आणि सॅन्टा बरबरा चित्रपट महोत्सव अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पोलका डॉट्सचा फंडा वापरला गेला होता. दीपिका पदुकोणचा ड्रेस डिझाइनर हा मरमार हालिम होता तर स्टायलिस्ट शालिना नथानी ही होती. खरंतर आता आंतरराष्ट्रीय फॅशनची नाळ मोठमोठय़ा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बऱ्याच उपक्रमांशी जोडली गेली आहे, त्यातून आता जग बऱ्यापैकी जवळ आल्याने फॅ शनकर्त्यांना विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात अशा महोत्सवातून, पुरस्कार सोहळ्यातून फॅ शनची देवाणघेवाण होते आहे आणि सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींनाही विविध प्रकारची आंतरराष्ट्रीय फॅशन अवलंबवता येत आहे. त्यामुळे कुठेतरी या देवाणघेवाणीतून एक वेगळा आंतरराष्ट्रीय ट्रेण्डही सेट होतो आहे. वर म्हटल्याप्रमाणे पोलका डॉट्ससह स्ट्राइप पॅटर्न्‍स असणारे आउटफिट्सही व्हेनिस चित्रपट महोत्सव, कान्स, आणि टोरांटो चित्रपट महोत्सव अशा स्तरावर मोठय़ा सेलिब्रिटींनी परिधान केले होते आणि जे यंदा ‘मामि’मध्येदेखील पाहायला मिळाले. अनन्या पांडे, सोभिता धूलिपाला, दिव्या दत्ता, कनिका धिल्लोन, तापसी पन्नू, शबाना आझमी, सयामी खेर यांनी रेषारेषांच्या कपडय़ांचा फंडा वापरला होता. दिव्या दत्ताने मोनोक्रोम असणारी चौकटी पॅटर्न्‍सची साडी वापरली होती. कनिका ढिल्लोन हिने काळ्या साडीवर काळ्या-पांढऱ्या रेषांच्या पॅटर्नचा ब्लाऊ ज घातला होता. तर कपाळावर कुंकवासारखी लाल टिकलीही वापरली होती, त्यामुळे पारंपरिक फ्यूजनमधला तिचा लुक वेगळा ठरला.

अनन्या पांडे हिची डिझाइनर होती रशियन फॅशनडिझाइनर उलियाना सरगिनको. अनन्याने जॅकेट ड्रेस परिधान केला होता आणि तिच्या स्ट्राइप्सचाच पण पूर्ण हातांचा असा ड्रेस तिने परिधान केला होता. तर तापसी पन्नूनेही ठळक रेषांचा ड्रेस परिधान केला होता, आधुनिक पद्धतीचा जॅकेट पलाझो पद्धतीचा तिचा ड्रेस होता. त्याला साजेशी केशरचनाही तिने केली होती. सयामी खेरनेही रेषांचाच मात्र थोडा स्पोर्टी लुक असलेला ड्रेस घातला होता. शबाना आझमी यांनी रंगीत साडीला पसंती दिली. तर ‘सुपर ३०’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही चुण्याचुण्यांचा काळा स्कर्ट घातला होता. सोभिता धूलिपाला हिने लोकरीसारख्या कपडय़ाचा कृष्णधवल रेषांचा स्कर्ट आणि टीशर्ट टॉप घातला होता. त्याला स्कार्फची जोड देत पूर्ण पाश्चिमात्य लुक तिने ठेवला होता.

‘मामि’ महोत्सवात सेलिब्रिटींनी दोनदा हजेरीही लावली होती आणि त्यातून दोन्ही वेळेस त्यांची फॅ शनपारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीची होती. दीपिकाने दोन्ही वेळेस गाऊनलाच प्राधान्य दिले. पोलका डॉट्स आणि मोनोक्रोम गाऊ न असे तिचे ड्रेस होते. खरं म्हणजे रेषांप्रमाणे मोनोक्रोम फॅ शनलाही सेलिब्रिटींनी पसंती दिली. करीना कपूरनेदेखील मोनोक्रोम जम्पसूट घातला होता. त्यानंतर सयामीने पारंपरिक लेहेंगा कुर्ता आणि त्यावर आधुनिक लुक ठेवला. सोभिता धूलिपाला हिने एकदा ‘रॉ मँगो’ या लेबलची साडी आणि नंतर पाश्चिमात्य पेहरावाचा पर्याय वापरला. शबाना आझमी या एकदा डिझाइनर पंजाबी ड्रेसमध्ये दिसल्या तर नंतर पारंपरिक साडीमध्ये. कोंकणा सेन शर्मानेही एकदा निळ्या बॉर्डरची साडी तर नंतर पलाझो पॅन्ट्स आणि ब्लॅक टॉप घातला. सोना मोहपात्राने केशरी शिमरचा जॅकेट सूट, ब्लेझर सूट आणि तिचा चेहरा असलेल्या प्रिंटचा टीशर्ट आणि जीन्स असे विविध ड्रेस परिधान केले होते.

नवनवे ड्रेस आणि लुकसह आपली छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट करणारे सेलिब्रिटी बऱ्याचदा आपल्या डिझाइनर आणि स्टायलिस्टविषयी कौतुक करताना दिसतात. या वर्षी जसा महोत्सवात पारंपरिक आणि आधुनिक पेहराव, त्याला त्याच पद्धतीच्या लुकची जोड देत आंतरराष्ट्रीय दर्जाचे लुक्स समोर ठेवले याच पद्धतीचे नवे ट्रेण्ड्स पुढच्याही वर्षी पाहायला मिळतील याची खात्री वाटते.